

Parbhani Election: वार्ड पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका यावेळी एकाच वॉर्डमध्ये चार प्रभाग अशा होत आहेत. सुरुवातीला या प्रभाग पद्धतीचे राजकीय पक्षांनाही अप्रूप होतं, पण आता उमेदवारांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रचार आणि मतदारांच्या थेट भेटीगाठी घेतल्यानंतर येणारा अनुभव यामुळं उमेदवार चांगलेच धास्तवाले आहेत. तीन-चार उमेदवारांच्या प्रभागामुळं मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंगचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांचं टेन्शन वाढलं आहे.
वार्डऐवजी प्रभाग पद्धती आल्यानंतर याचा फायदा सत्ताधारी पक्षाला विशेषतः भाजपला होणार, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात निवडणुका जाहीर होऊन, उमेदवारांना तिकीट देऊन प्रचाराला सुरूवात झाल्यानंतर परिस्थिती वेगळी असल्याचा अंदाज उमेदवारांना येऊ लागला आहे. एका मतदाराला चार उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत, म्हणजेच चारवेळा मतदान करावं लागणार आहे. यामुळं महिला मतदारांमध्येही संभ्रमाचं वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळं वार्ड पद्धतच बरी होती, असं म्हणण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे.
क्रॉस वोटिंगच्या भीतीनं उमेदवारांची अक्षरशः झोप उडाली आहे. महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांश प्रभागात एक-दोन 'सक्षम' उमेदवाराच्या जोडीला अन्य तीन किंवा दोन उमेदवार त्या उमेदवारांच्या किंवा पक्षातील एखाद्या नेत्यांच्या मर्जीतील दिले आहेत. नेत्यांच्या मर्जीतल्या अनेक उमेदवारांना दगाफटका होण्याची भीती असल्यानं ती त्यांची पाठ सोडत नाहीए. तर काहींना सक्षम उमेदवारानं आपल्याला सोडल्याचं लक्षात आल्यानंतर स्वतंत्र प्रचार सुरू केला असला तरी मनात धाकधूक कायम आहे.
परभणी महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतही क्रॉस वोटिंगचा अनेक उमेदवारांना फटका बसला होता. 16 पैकी 10 प्रभागात क्रॉस वोटिंग झाली होती. केवळ प्रभाग क्रमांक दोन, सहा, सात, आठ, 14 आणि 15 या प्रभागात एका पक्षाचे चार किंवा पाच उमेदवार समुहाने निवडून आले होते. उर्वरित प्रभागात मात्र विविध पक्षाचे एक किंवा दोन उमेदवार निवडून आले होते. काही प्रभागात चारही उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे किंवा अपक्ष निवडून आले होते.
शहराच्या बहुतांश प्रभागात आता 'शेख अपनी-अपनी देख' या उक्तीप्रमाणे अनेक उमेदवार फक्त स्वतःच्या मतासाठी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. एकत्रित प्रचार अनेक पक्षाचे उमेदवार करीत असले तरी त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक मात्र बाकी कुणालाही द्या पण एक मत मात्र आमच्या उमेदवाराला द्या, अशी विनवणी मतदारांना करत असल्याचं दिसून येतं आहे. त्याचा परिणाम क्रॉस वोटिंगमध्ये होणार असल्याचा अंदाज आहे.
ज्या ठिकाणी मतदार जागृत आहे, सुशिक्षित आहेत अशा प्रभागात क्रॉसवोटिंग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं अशा प्रभागात वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत बहुतांश पक्षांनी धनदांडग्या, दबंग उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. काही पक्षांनी पक्षातीलच असे उमेदवार शोधले असले तरी अनेक पक्षांनी ऐन निवडणुकीत अशा उमेदवारांना उतरवले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत लक्ष्मी अस्त्रांचा पुरेपूर वापर होण्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याचा परिणाम क्रॉस वोटिंगवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.