NCP Beed News : बीड नगर पालिका निवडणुकीत कठीण काळात आणि प्रतिकुल परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. नगराध्यक्ष प्रेमलता पारवेंनी आपल्या पदाचा पदभारही स्विकारला. परंतु, नेते आमदार विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत झालेल्या आनंदी सोहळ्यावेळी अंतर्गत रुसवे - फुगवे समोर आल्याने पुढील पाच वर्षे वाटचाल कशी राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आता पुढील पाच वर्षे ही 'घडी'विस्कटू न देण्याचे आव्हान आमदार विजयसिंह पंडित यांच्यासमोर आहे.
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पारवेंसह 19 नगरसेवक विजयी झाले. 15 नगरसेवकांसह भाजप दुसऱ्या स्थानी तर 12 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तिसऱ्या स्थानी राहीला. दरम्यान, राष्ट्रवादीने सोबत लढलेल्या शिवसेनेच्या तीन नगरसेवकांसह काँग्रेस व एमआयएमच्या प्रत्येकी एक अशा 24 नगरसेवकांची शिव - शाहू - फुले - आंबेडकर बीड शहर विकास आघाडी स्थापन करुन माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल यांना गटनेता केले.
मात्र, पदग्रहाणावेळी सर्वांना फेटे बांधत असतानाच फारुक पटेल यांनी नकार दिला. मी गटनेता नाही, मला फेटा नको, असा त्यांचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे काही धुसफुस तर सुरु नाही ना, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यातून मार्ग काढून पदग्रहण सुरु झाल्यानंतर प्रशासनाकडून सत्कार आणि नेत्यांच्या भाषणावेळी अमर नाईकवाडे यांनी क्षीरसागरांवर चांगलीच फटकेबाजी केली. पंडित क्षीरसागरांच्या छाताडावर बसल्याचे सांगत बीडचा आमदारही घड्याळाचाच असेल, असे सांगून टाकले.
मात्र, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी हरळुन जाऊ नका, या विजयात शिवसेनेचाही वाटा असल्याचे लक्षात आणून दिले. बीडकरांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत, ही जागा शिवसेनेची असल्याचे सांगीतले. तुमचा आमदार होणार असेल तर आम्ही काय करायचे? असे म्हणत मग आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विचार करावा, लागेल असा सुचक इशारा दिला. यावर विजयसिंह पंडित यांनी मात्र राजकीय मुद्द्यांना बगल देत शहराच्या विकासावर फोकस केला.
निवडणुकीत आरोप - प्रत्यारोप झाले ते बस्स, झाले. आता बीडकरांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केले.मुख्याधिकाऱ्यांनी शिस्त लावावी, प्रशासन चांगले चालवावे, सर्वांनी नीट काम करावे, अशी सुचना त्यांनी केली. शहरात नियमित पाणी येण्यासाठी सोलार बसविण्यात येईल. सर्वांनी बीडकरांच्या अडचणी, समस्या जाणून घ्याव्यातही आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. अजित पवारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी काम करण्याचे आवाहन पंडित यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.