

Chhatrapati Sambhahjinagar News : महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. मंगळवारी अर्जाची छाननी पार पडल्यानंतर त्याच रात्रीपासूनच भाजप, शिवसेना, एमआयएम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्ष, काँग्रेस या सगळ्याच पक्षांनी बंडखोरांना माघारीसाठी विनंत्या केल्या. भाजप-शिवसेना या दोन पक्षांना बंडोबांना थंडोबा करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. काही प्रमाणात दोन्ही पक्षांना यश आले असले तरी सर्व राजकीय पक्षांचे मिळून अडीचशेवर अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
यापैकी 50 उमेदवार हे प्रस्थापित उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडवू शकतात असे आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट हिचे महापालिकेच्या निवडणुकीतून राजकीय लाॅचिंग होत आहे. या शिवाय माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट दुसऱ्यांदा मैदानात आहेत. या दोघांना बिनविरोध करण्यासीठी पालकमंत्र्यांनी अटोकाट प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही, अशी चर्चा आहे.
आता शिरसाट यांच्यासह भाजपचे मंत्री अतुल सावे, खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्याही घरातील किंवा जवळच्या उमेदवारांना अपक्षांच्या उमेदवारीमुळे टेंशन आले आहे. 10 वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी स्वबळावर दंड थोपटत पहिल्यांदाच 85 ते 90 टक्के जागा लढवण्याचे धाडस दाखवले आहे.
महायुतीतील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही घटक पक्ष, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे स्वबळावर लढत आहेत. एमआयएम, बसपा, वंचित बहुजन आघाडीनेही आपला सवता सुभा उभारला आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या 29 प्रभागांसाठी तब्बल 859 वर पोहचली आहे. तब्बल 1870 जणांनी अर्ज घेतले होते. त्यातील 97 जणांचे अर्ज छाननीत बाद झाले. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 521 उमेदवारांनी माघार घेतली.
महापालिकेत 115 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या 29 पैकी 28 प्रभागांत चार, तर 29 व्या प्रभागात 3 नगरसेवक राहणार आहेत. प्रत्येक प्रभागाचा विचार केल्यास अ, ब, क, ड असे उमेदवार आहेत. प्रत्येक प्रभागात भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व एमआयएम पक्षाचे प्रमुख उमेदवार आहेत. त्यासोबत बंडखोर व अपक्ष उमेदवार देखील असून, प्रमुख उमेदवारांचा विचार केल्यास चौरंगी, पंचरंगी लढती होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.