Beed News: केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाच्या हत्येनंतर बीडचे राजकारण पुन्हा तापले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधीमंडळात आमदार धनंजय मुंडे, मंत्री पकंजा मुंडे यांनी हे प्रकरण लावून धरले. तसचे बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याच्यावर कारवाई करण्याची मागणी व त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. यावर बजरंग सोनवणे यांनी आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी मतदारसंघातील तौहीद खान, बापू आंधळे, महादेव मुंडे प्रकरणावरही बोलावे, असे आवाहन केले होते.
आज धनंजय मुंडे यांनी तौहीद खान हत्या प्रकरणात नशेखोरी हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगत नशेखोरांवर कठोर कारवाईची मागणी विधीमंडळ अधिवेशनात केली. तसेच तौहीद खान यांचे कुटुंब अत्यंत गरीब आहे, त्यांची तीन मुलं आहेत, कर्ता पुरूष गेल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे. या कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
परळीतील मयत तौहीद खान हत्या प्रकरणी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून तौहीद खानच्या कुटुंबियांनी मागणी केल्याप्रमाणे यात आणखी कुणाचा समावेश आहे का? याबाबत सखोल तपास करावा. तौहीद हा घरातील कर्ता असल्याने त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी सरकारने विशेष आर्थिक मदत करावी. तसेच या प्रकरणी नशेखोरी हे एक महत्त्वाचे कारण ठरले असून बीड जिल्ह्यातील तरुणांमध्ये वाढत्या नशेखोरीबाबत कठोर कारवाई करण्यासाठी विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.
परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणी मी पुढील आठवड्यात विधिमंडळात सखोल चौकशी तसेच वाढत्या नशेखोरीबाबत कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे मुंडे यांनी २५ जून रोजी सांगीतले होते. तोहीद खान यांच्या हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपी अटकेत असून या केसचा सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास केला जावा, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगीतले होते.
तौहीद खान यांच्या कुटुंबियांची मी याआधी भेट घेतलेली असून त्यांना तात्पुरती आर्थिक मदत करत त्यांच्या तीनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचे त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून म्हटले होते. विलास घुले हत्या प्रकरणी आवाज उठवत असताना विलास यांचा अंत्यविधी बाकी होता, त्यामुळे ते प्रकरण तातडीचे होते. तसेच विलास घुले व तौहीद खान प्रकरणी एकच वेळी बोलल्यास अर्थात दोन वेगवेगळे विषय एकाच वेळी हाताळल्यास त्या विषयांचे महत्व कमी होऊ शकते, याची मला पूर्ण जाणीव आहे. तौहीद खान या आमच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, किंबहुना मी ती माझी जबाबदारी समजतो, असे मुंडे यांनी म्हटले होते.
दरम्यान, २० जून रोजी विलास घुले या तरूण हाॅटेल चालकाची एका टोळक्याने चाकूने हल्ला करून हत्या केली होती. या प्रकरणाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या थार गाडीतून आरोपी पळाले असा आरोप घुले कुटुंबीय आणि टाकळी ग्रामस्थांनी केला होता. तर राजकीय सूडातून आपल्या मुलाचे आणि आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचे खासदार सोनवणे यांनी म्हटले होते.
सोनवणे-मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सोनवणे यांनी ज्या तत्परतेने धनंजय मुंडे यांनी विलास घुले हत्या प्रककरण विधीमंडळात लावून धरले. त्याच पद्धतीने परळीतील तौहीद खान, बबन गीते, महादेव मुंडे यांच्या प्रकरणावरही बोलावे, असे आव्हान धनंजय मुंडे यांना दिले होते. तौहीद खान प्रकरणावर सखोल चौकशीची मागणी करत धनंजय मुंडे यांनी सोनवणे यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.