Parli Crime News : बीड जिल्ह्यातील परळी येथे 31 मे रोजी तौहीद खान या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येने परळीमध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान, पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या हत्या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात आमदार धनंजय मुंडे यांनी या हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन केले आहे. आरोपींवर लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
तौहीद खान या आमच्या परळीतील तरुण भावंडाच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. याविषयी मी सातत्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. तौहीदच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, त्यादृष्टीने पुढील तपास व चार्जशीट दाखल करण्याबाबत पुढेही आम्ही पाठपुरावा करू. वैद्यकीय कारणास्तव मी मागील 4-5 दिवस बाहेर असल्याने मला याबाबत व्यक्त होता आले नाही.
परळीत हिंदू - मुस्लिम सर्व समाज बांधव एकोप्याने अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. आमचा हा एकोपा बाधित होऊ शकत नाही. त्यामुळे कृपया कुणीही या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये. तौहीद खान यांस भावपूर्ण श्रद्धांजली, अर्पण करतो. मी संपूर्ण खान कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. परळीत पोहचताच मी कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील परळी येथे 31 मे रोजी पैशांच्या वादातून 36 वर्षीय अफझल उर्फ तौहिद खान कैराती खान याची त्याच्याच दोन मित्रांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या 48 तासांत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली होती. मुख्य आरोपी ऋषिकेश परमेश्वर फड (वय 27, रा. सोमेश्वरनगर, परळी) आणि गौरव दीपक व्यास (वय 26, रा. स्नेहनगर, परळी), अशी त्यांची नावे आहेत.
हे दोघेही मृत तौहिदचे जवळचे मित्र होते. हत्या केल्यानंतर आरोपींनी ही आत्महत्या असल्याचा बनाव केला होता. 31 मे रोजी हे तिन्ही मित्र कारमधून परळी तालुक्यातील वरवटी शिवार परिसरात गेले होते. रात्री मद्यपान करत असताना त्यांच्यात पैशांवरून मोठा वाद झाला. या वादातून दोन्ही आरोपींनी तौहिदला दगडाने ठेचून ठार मारले.
हत्येनंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचा भासवण्यासाठी आरोपींनी तौहिदचा मृतदेह रेल्वे रुळावर आणून टाकला. आरोपींनी रचलेला आत्महत्येचा बनाव घटनास्थळी आलेल्या काही मोकाट कुत्र्यांमुळे फसला. कुत्र्यांच्या हालचालींमुळे संशय बळावला आणि पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही मित्रांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशीअंती त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. या घटनेनंतर स्थानिक भागात आणि सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. तौहिद खान याला न्याय मिळवून देण्यासाठी विविध संघटनांनी आणि मुस्लिम समाजाने बीडमध्ये निदर्शने केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.