

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींनी वेग पकडला आहे. प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी,चर्चा, बैठका यांनी राष्ट्रवादी पक्षातील लवकरच मोठ्या घडामोडींबाबतचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार,जय पवार हे राजकारणात पूर्णपणे पक्षात सक्रीय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळीचे आमदार धनंजय मुंडेंवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत धनंजय मुंडेंसह अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल,खासदार पार्थ पवार यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक ही देवगिरी बंगल्यावर झाल्याची माहिती समोर येत आहे.ही बैठक अत्यंत गोपनीयरित्या पार पडल्याचं बोललं जात आहे. बैठक पार पडली आहे, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
याच बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासह गेले वर्षभरापासून बॅकफूटला गेलेल्या धनंजय मुंडेंनाही संधी मिळण्याची माहिती समोर येत आहे.
देवगिरीवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून काही नेत्यांना वगळण्यात यावं असाही सूर उमटल्याचं समोर येत आहे. यात विशेष म्हणजे एका महिला लोकप्रतिनिधीचाही समावेश आहे. ही सर्व चर्चा प्राथमिक स्तरावर पार पडल्याचं बोललं जात आहे.
पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नेमकी कोणाची वर्णी लागणार, कोणाला डच्चू मिळणार याविषयी कोणतीही अधिकृत माहिती पक्षाकडून देण्यात आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत वर्णी लावण्यासाठी काही इच्छुक नेत्यांनी आधापासूनच जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पडद्यामागच्या एकंदर घडामोडींवरुन अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. यात राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे यांचा पत्ता कट झाल्याचीही चर्चा मध्यंतरीच्या काळात जोर धरू लागली होती. त्यांच्या नाराजीबाबतही चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर विशेष बाब म्हणजे या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अचानक भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती.त्यावेळी शाह आणि मुंडे या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास झाली होती. एकीकडे महायुती सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आले असतानाच मुंडे आणि शाह यांच्यातील ही भेट निश्चित मोठी राजकीय घडामोड असल्याचं मानलं गेलं होतं.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि खून प्रकरणात काही गंभीर आरोपांचे शिंतोडे धनंजय मुंडे यांच्याही अंगावर पडले होते. यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर ते वर्षभराहून अधिक काळ पक्षात काहीसे बॅकफूटलाच गेल्याचं दिसून येत होतं.
तसेच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात अजित पवारांसमोरच पक्षानं आता फार काळ रिकामं बसून न ठेवता काहीतरी काम करण्याची संधी द्यावी, असं म्हणत आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली होती. यानंतर आता सुनेत्रा पवार धनंजय मुंडेंना मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.