नितीन चव्हाण
Beed Police News : वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, खंडणी, खून, अपहरणासारख्या घटनांनी बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात, अशी खळबळजनक कबुली अपर पोलीस अधिक्षकांनीच दिली. आधीच बदनाम असलेल्या पोलीस दलासाठी हा घरचा आहेर डोकेदुखी ठरणार आहे.
पिंपळनेर प्रकरणातील गंभीर गुन्ह्यावर बोलताना असे खूप गुन्हे होतात, अशी उडवाउडवीची उत्तर देत केलेल्या अपर अधीक्षकांच्या विधानाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कायदा अन् सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, सर्व पोलीस ठाणेप्रमुख आणि कर्मचार्यांना शिस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे आक्रमक धोरण राबवत आहेत. मात्र, त्यांच्या या धोरणाला खात्यातील वरिष्ठ सहकाऱ्याकडून कसा हरताळ फासला जातो हे अपर पोलीस अधीक्षकांच्या बेजबादार विधानाने समोर आले आहे.
पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलेल्या विधानामुळे पोलीस दलाच्या कार्य पद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची माहिती देण्यासाठी गुरुवारी अपर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी समीर शेख यांनी चक्क बीड जिल्ह्यात सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात, अशी कबुली दिली.
अंथरवण पिंपरी तांडा (ता. बीड) येथील भांडणात गंभीर जखमी झालेले बबन पवार यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या नातेवाइकांनी बबन पवार यांचा मृतदेह थेट पिंपळनेर पोलीस ठाण्यात नेऊन तीव्र आंदोलन केले. नातेवाइकांचा असा आरोप होता की, आमच्या माणसाला मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आला, तरीही उलट आमच्यावरच हाफ मर्डर (कलम ३०७) सारखे गंभीर आणि खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
याच घटनेचा संदर्भ देत पत्रकारांनी, खासदारांच्या पुत्रावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून ज्या प्रकारची दक्षता व काळजी घेतली जाते, तशी काळजी सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठेच नसल्याचे ठोस पुरावे देऊनही पोलीस प्रशासनाकडून दखल का घेतली जात नाही? सर्वसामान्यांच्या बाबतीत पक्षपातीपणा का होतो? असा सवाल विचारला.
या प्रश्नावर उत्तर देताना अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी उत्तर दिले की, बीड जिल्ह्यात सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात. एका जबाबदार वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्याकडून अशी जाहीर कबुली दिली गेल्याने आधीच बदनाम असलेल्या बीड जिल्ह्यात राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले जातात, या आरोपवरच एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.