BhagwanGad controversy : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भगवान गडावरील महंत नामदेवशास्त्री महाराज यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार होती. पण प्रकृती बिघडल्याचे कारण सांगत, प्रतिक्रिया देणे टाळले होते.
नामदेवशास्त्री महाराज आज मात्र माध्यमांसमोर येत त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात केलेले पहिले विधान अजाणतेपणानं, तुटपुंज्या माहितीच्या आधारावर केल्याचे म्हणत, हा खटला आता फास्ट ट्रक न्यायालयात चालवून संबंधितांना शिक्षा द्यावी आणि देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा, असे म्हटले आहे.
बीडमधील (BEED) संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात गाजत आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्याची टोळी या गुन्ह्यात आरोपी आहे. एसआयटीने या गुन्ह्याचे दोषारोपपत्र आता न्यायालयात दाखल केले आहे. यानंतर देशमुख यांना क्रूरतेने करण्यात आलेल्या मारहाणीचे आठ फोटो आणि 15 व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यानंतर कडक भूमिका घेत, धनंजय मुंडे यांना राजीनाम द्यायला लावले. धनंजय मुंडे यांनी आजारपणाचे कारण देत, राजीनामा दिला. संतोष देशमुख हत्येप्रकरणाच्या कौर्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया आल्या. बीडमध्ये बंद पुकारण्यात आला होता. भगवान गडावरील महंत नामदेवशास्त्री महाराज यांनी मात्र प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. ते आज माध्यमांसमोर आले.
संतोष देशमुख यांच्या हत्येत धनंजय मुंडे मंत्री असताना टार्गेट झाले होते. काही दिवसांपूर्वी ते भगवान गडावर गेले होते. महंत नामदेवशास्त्री महाराजांची भेट घेतली होती. या भेटीनंतर नामदेवशास्त्री महाराज यांनी मुंडे यांची पाठराखण केली होती. त्यावर गदारोळ झाला होता. दुसऱ्या दिवशी देशमुख कुटुंबियांनी नामदेवशास्त्री महाराजांची भेट घेतली. त्यानंतर शास्त्रींनी त्यांचे विधान मागे घेत, देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भगवान गड ठामपणे उभा आहे, असे म्हटले होते.
नामदेवशास्त्री महाराज म्हणाले, "पहिल्या दिवसांचे वक्तव्य होते, अजाणतेपणाचे होते. दुसऱ्या दिवशी धनंजय देशमुख परिवार गडावर आला, त्याची जाणीव मला करून दिली की, हे किती भयंकर क्रूरता आहे, त्याची मला जाणीव झाली. माझे अतंकरण दुःखावले, हेलावले, न्यायालयाला माझी प्रार्थना आहे की, लवकरात लवकर फास्ट ट्रक हे प्रकरण घेऊन, संबंधितांना शिक्षा मिळावी. भगवान गड पीडित कुटुबांच्या मागे उभा आहे, आजही उभा आहे. ते आजही सांगतो".
लोकांनी गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन करताना, पहिल्या दिवसाचे वक्तव्य होते, ते घटनेचे पूर्ण क्रूरता माहित नव्हती. दुसऱ्या दिवशी परिवाराने सांगितल्यावर, मला त्याची जाण झाली. मग माझ्या लक्षात आले की, ही क्रूरता किती भयंकर आहे. निर्घृण खून आहे. अजाणतेपणाने वक्तव्य झाले आहे, मनुष्य आहे होत असते. पहिल्या दिवशीचे वक्तव्य होते, ते तुटपुंज्या माहितीच्या आधारावर होते. दुसऱ्या दिवशी देशमुख कुटुंब आल्यावर क्रूरतेची जाणीव झाली. फास्ट ट्रकवर हा खटला चालवून देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, ही मागणी असणार आहे, असे नामदेवशास्त्री महाराज यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.