MP Bajrang Sonwane BJP MLA Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Beed Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड मास्टरमाईंड मग, खासदार सोनवणे अन् आमदार धसांचा रोख कोणाकडे?

Beed Santosh Deshmukh murder case Walmik Karad MP Bajrang Sonwane BJP MLA Suresh Dhas : बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषारोपपत्रात वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचा दावा 'सीआयडी'ने केला आहे.

Pradeep Pendhare

Beed Crime News : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात या हत्येचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. यानंतर त्याच्यावर बीडच्या राजकारणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांच्या प्रतिक्रियांचा रोख आणखी कोणाकडे होता, यावरून आता राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड याला रसद, आशीर्वाद देणाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी केली. तर भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली.

खासदार सोनवणे म्हणाले, "या हत्येप्रकरणातील मास्टरमाईंड पकडला पाहिजे, हे सुरवातीपासूनची मागणी होती. ही घटना अतिशय निंदनीय आहे. मी वारंवार सांगत आलो आहे की, याचा मास्टरमाईंड परळीला (Parli) बसायचा. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दहशत निर्माण केली होती. वाल्मिक कराड परळीत येऊन बसायचा, त्यामुळे त्याला कोणाचा सपोर्ट असणार हे जगजाहीर होते". वाल्मिक कराडने गोरगरीब लोकांना त्रास देत, त्यांच्याकडून खंडणी गोळा केली, असा घणाघात देखील खासदार सोनवणे यांनी केला.

'दाखल दोषारोपपत्र 29 नोव्हेंबरपासून पुढचे आहे. त्याअगोदरचा सुद्धा खंडणीचा गुन्हा घडला आहे. तो अवादा कंपनीने 28 मे रोजी दाखल केला होता. तो सुद्धा यात घेतला पाहिजे. तो सुद्धा असाच प्रकार आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक-एक माणूस यांनी नेमला होता. धाराशिवमधील कळम, परंडा, भूम तालुक्यात देखील यांची माणसं होती. सत्तेचा गैरवापर, पदावर बसवलेल्या पोलिसांचा फायदा घेणे. मर्जीतले अधिकारी बीडमध्ये आणून बसवणे, असे प्रकार सुरू होते', असा गंभीर आरोप खासदार सोनवणे केला.

मास्टरमाईंडला रसद पुरवणाऱ्यांना आरोपी करा

'सीसीटीव्हीमध्ये आणखी दोन-चार जण आढळून आले आहेत. त्यांनी आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचे दिसते. त्यांना देखील सहआरोपी केले पाहिजे. या मास्टरमाईंडला कोण रसद पुरवत होतं, त्याला कोणाचा आशीर्वाद होता, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे', अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली.

परळीच्या गँगची बीडमध्ये दहशत

सुरेश धस म्हणाले, "या घटनेविषयी पहिल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. देशमुख यांच्या कुटुंबियांने केलेल्या प्रत्येक तक्रारीवर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार होता. त्याचे कार्यक्षेत्र हे परळी पुरते मर्यादीत नव्हते. संपूर्ण बीड जिल्ह्यात त्याची गँग कार्यरत होती. पाटोदा, शिरूरसह बीड जिल्ह्यात त्याने त्याचे प्रस्थ निर्माण केले होते. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे".

त्यामुळे 80 दिवसात दोषारोपपत्र दाखल

खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटना एकत्र आहेत. एसआयटीने तपास योग्य करत 80 दिवसात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मकोका अंतर्गत आरोपींना 90 दिवसांनंतर जामिनासाठी अर्ज करता येतो. त्यामुळे 80 दिवसातच दोषारोपपत्र दाखल केल्याचे आमदार धस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT