Bhokardan Municipal Council : माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांचे निवासस्थान आणि मतदारसंघातील भोकरदन नगरपालिका निवडणुकीत काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जालना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. दानवे पिता-पुत्रांना भोकरदन नगरपालिकेची सत्ता आतापर्यंत मिळवता आली नाही, ती यावेळी मिळते का? भोकरदनमध्ये सत्ता पालट होतो की मग काँग्रेस आपली पकड कायम राखते? यावर पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.
भोकरदन नगर परिषदेची निवडणूक यंदा अवघ्या शहरापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील सर्वात चर्चेची ठरली आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात तिरंगी सामना झाला. तालुक्यातील या तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जोर लावल्याने नगरपालिकेत 'काँटे की टक्कर' झाल्याचे बोलले जाते. विजय आणि पराभवातील अंतर फारसे असणार नाही, असाही दावा केला जात आहे. विकासकामे, क्षेत्रीय संघटना, सामाजिक समीकरणे, धार्मिक ध्रुवीकरण, तरुणांचे मत आणि स्थानिक नेत्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा या सर्व घटकांचा एकत्रित प्रभाव या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला.
रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा भोकरदन नगरपालिकेत सत्ता मिळवू शकले नव्हते शिवाय यंदाच्या लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्याची संधी या निवडणुकीत शोधून आमदार संतोष दानवे यांनी काँग्रेसला खिंडीत पकडण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. केंद्र व राज्यातील सत्तेच्या पुरेपूर फायदा घेत दानवे यांनी साम-दाम-दंड-भेद या सर्व नीतीचा वापर या निवडणुकीत केला.
रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रात दोन वेळा मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पाच वेळा सलग खासदार, घरात संतोष दानवे यांच्या रुपाने दोन टर्म आमदारकी असताना नगरपालिकेत सत्ता मिळवणे खरंच अवघड होते का? असा प्रश्न कायम विचारला जायचा. यंदाच्या निवडणुकीत मात्र संशयाचे हे जाळे दूर करण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवे आणि विशेषतः आमदार संतोष दानवे यांनी केल्याचे दिसून आले.
भाजपने ही निवडणूक मनावर घेतली हे त्यातून दिसून आले. भाजपने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत आमदार संतोष दानवे यांनी सर्व सूत्रे हाती घेतली. बुथ स्तरावरील बैठका दररोजचा जनसंपर्क, प्रत्येक प्रभागातील मतदान त्याची टक्केवारी यावर बारकाईन लक्ष ठेवल्यामुळे भाजपची मोहीम इतरांच्या तुलनेत उजवी ठरली. एरवी एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार तर झाली अन् भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आशा माळी रेसमध्ये आल्या.
काँग्रेसने या निवडणुकीत पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत शहरासाठी विकासाची ब्ल्यू प्रिंट आणि सविस्तर वचननामा जाहीर करत आपला पॅटर्न बदलल्याचे दिसून आले. उच्चशिक्षित आणि तरूण उमेदवार नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवत मतदारांना विचार करायला भाग पाडले. प्रियंका देशमुख यांच्या रुपाने काँग्रेसने नवा चेहरा देत जातीय समीकरणांपेक्षा व्हिजनला अधिक महत्व दिल्याचे चित्र मतदारांपर्यंत पोहचवले. नगरसेवक पदासाठी 10 मुस्लिम उमेदवार व नवीन चेहरे देत सोशल इंजिनिअरिंग बिघडणार नाही? याची काळजीही राजाभाऊ देशमुख यांनी घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोकरदनमधील मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या पाहता नगराध्यक्षपदासाठी अल्पसंख्याक उमेदवार दिला. 2017 मधील पॅटर्नच चंद्रकांत दानवे यांनी या निवडणुकीतही राबवल्याचे दिसून आले. शहरातील मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते खेचण्याचा त्यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. माजी आमदार चंद्रकांत दानवे निवडणुक काळात भोकरदनमध्येच तळ ठोकून होते. स्थानिक मुद्द्यांचे राजकारण, काही भागातील नाराजी, तसेच शरद पवार यांच्या प्रतिमेचा शहरातील विशिष्ट वर्गावर असलेला प्रभाव, या सर्व गोष्टी कॅच करण्याचा पुरेपूर प्रयत्न या पक्षाने केला आहे.
या निवडणुकीत निवडणूक विभागाचा कारभार मोठ्या प्रमाणावर टीकेच्या केंद्रस्थानी राहिला.मतदार याद्यांमधील चुका, चुकीचे मतदान केंद्र, पत्त्यातील विसंगती, आणि वेळेवर माहिती न मिळाल्याने मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करता आले नाही. हा गोंधळ अत्यल्प फरकात निर्णय लागणाऱ्या लढतीत निर्णायक ठरणार आहे.
याशिवाय निवडणुकीत काही प्रभागांत क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या चर्चा आहे.पक्षविरोधी कार्यकर्ते , स्थानिक राजकीय अडचणी व जातीय समीकरणे, नाराज झालेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन अनेक जागांवर मतदानाचे चित्र पालटले असल्याचे बोलले जाते. त्याचा परिणाम नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतही दिसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.