Sanjay Shirsat - Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : येत्या सोमवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप? दानवेंच्या खंडनानंतर संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होत असतानाच अजूनही राज्यात अनेक राजकीय भूकंप होणार असल्याचे दावे सत्ताधारी महायुतीकडून केले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील ठाकरे गटांमध्ये कुरबूर सुरू झाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळणार हे लक्षात आल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वेगळाच सूर लावला आहे.

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर टीका करताना आपण दहा वर्षांपासून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगत पक्षाकडे अजूनही आपल्या नावाचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, लोकसभेच्या उमेदवारीसाठी अंबादास दानवे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या चर्चेचे खंडन करत मी उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि कायम शिवसैनिकच राहणार, असे म्हणत आपल्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मात्र अंबादास दानवे यांचे नाव न घेता त्यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सांगून टाकला. येत्या सोमवारी मोठा राजकीय भूकंप घडणार असून, मूळचे शिवसैनिक खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, असा दावा केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीतील शिवसेना शिंदे गटच लढवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

शिवसेनेकडून संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची नावे चर्चेत असून, आणखीन दोन नावे आमच्याकडे आहेत. परंतु ती आत्ताच उघड करणे योग्य ठरणार नाही ते तुम्हाला सोमवारी कळेल, असा सूचक इशाराही शिरसाट यांनी दिला. दरम्यान, संभाजीनगरची जागा भाजप लढवणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सभेत स्पष्टपणे सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात तयारी करत आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाने या जागेसाठी जोर लावल्यानंतर भाजपच्या गोटात सध्या शांततेचे वातावरण आहे. एवढेच नाही, तर ही जागा शिंदे गटाला सोडण्यात आल्याची चर्चा स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT