मराठवाडा

Nanded Political News : बाजार समितीसाठी भाजप-काँग्रेस युती म्हणजे नवी समीकरणे, की आणखी काही ?

Nanded Political News : नांदेडच्या माहूर तालुक्यात काँग्रेसने भाजपसोबत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी युती केली.

अनुराधा धावडे

साजीद खान

Nanded Political News : राजकारणात कायमचे मित्रत्व आणि शत्रुत्व नसते, असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात राज्यात सत्ता समीकरणासाठी झालेली मोठी उलथापालथ याचे ताजे उदाहरण आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपने शिंदे गट तयार केला म्हणा किंवा मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे गट अस्तित्वात आला असे समजा किंवा राष्ट्रवादीतून अजितदादांची शिंदे सरकारमध्ये एंट्री, अर्थ एकच होतो सत्ता आणि सत्ताच. मात्र, काँग्रेस याला अपवाद राहिली.

परंतु नांदेडच्या माहूर तालुक्यात काँग्रेसने भाजपसोबत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी युती करून जणू आम्ही काही जगा वेगळे नाही, असा संदेशच दिला. ही संधीसाधू युती औटघटकेचीच आहे की नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय स्वार्थापोटी वेगवेगळ्या पक्षातील नेते एकत्र येतात आणि त्यातून संधीसाधू युती जन्माला येते. याचाच प्रत्यय सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदारांना येत आहे. मात्र, या युतीमुळे भाजप व काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही नाराजी बोलून दाखवीत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. स्थानिक समीकरणे या निवडणुकांसाठी कळीचा मुद्दा ठरतात.

या निवडणुका शेतकरी हितासाठी असल्याचे ठासून सांगितले जात असले तरी राजकीय आणि स्वहितासाठीच या निवडणुकीत व्यूहरचना आखली जाते, हे सर्वश्रुतच आहे. या निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत गटबाजी, एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याचा हव्यास आणि मित्र पक्षांतील नेत्यांशी असलेले वैर यातून नवे राजकीय डाव खेळले गेले.

निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला लागल्यावर संधीसाधू युतींना यश येते की अपयश, हे तेव्हाच दिसेल. ही युती या निवडणुकीपुरतीच आहे असे काही नेते आता सांगत आहेत. परंतु आगामी काळात सध्या लांबणीवर पडलेल्या मात्र अटळ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातील बहुतांश निवडणुकादेखील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती पाहून लढवल्या जातात. या पार्श्वभूमीवर ही संधीसाधू युती नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

पक्षाचे दिग्गज नेते आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरोधात विरोधी पक्षांच्या नेत्यांशी युती करून स्थानिक निवडणुका लढवत असतील, तर या पक्षांनी आताच सतर्क होणे गरजेचे आहे. अन्यथा अशाच युती आणि आघाड्या आगामी निवडणुकांतही होतील, ही शक्यता नाकारता येणार नाही. कारण काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे ज्या पद्धतीने लोकसभा सदस्यपद रद्द करण्यात आले, ज्या पद्धतीने त्यांचे निवासस्थान रिकामे करण्यात आले होते. याचा अवघ्या दोन तीन महिन्यांत स्थानिक काँग्रेस नेत्यांना विसर पडणे म्हणजे शोकांतिका आहे.

दुसरीकडे प्रियांका गांधी आणि खुद्द सोनिया गांधींची सीबीआय आणि ईडी चौकशीचाही माहूरच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांना सोयीस्कर विसर पडतो व जिल्ह्याचे नेते अशोक चव्हाण हा सगळा खेळ उघड्या डोळ्यांनी बघतात. राजकीय जाणकार याचा अर्थ नवीन समीकरणांची नांदी म्हणून लावत आहेत, तर राजकीय वैरी असलेल्या भाजप आणि काँग्रेस या राजकीय पक्षांनी ‘हम साथ, साथ है’चा दिलेला संदेश मतदारांच्या पचनी पडत नसल्याचे सध्या तरी दिसते. तूर्त बाजार समिती निवडणुकांतील हातमिळवणीचे राजकीय भवितव्य आणि परिणाम याबाबत विविध तर्कविर्क लावले जात आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT