Ashok Chavan Nanded Rally sarkarnama
मराठवाडा

Ashok chavan news : झेंडा भाजपचा अन॒ कार्यकर्ते काँग्रेसचे; अशोक चव्हाणांच्या मिरवणुकीतील चित्र...

Nanded विशेष विमानाने नांदेडला दाखल झाल्यानंतर विमानतळापासून अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

Jagdish Pansare

Nanded News : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काल आपल्या कर्मभूमी नांदेडमध्ये परतले. राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांचे नांदेड मध्ये कसे स्वागत होते ? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते.

विशेष विमानाने नांदेडला दाखल झाल्यानंतर विमानतळापासून अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तसं पाहिलं तर नांदेडकरांसाठी हे चित्र फारसे नवे नव्हते. फरक फक्त एवढाच होता तो म्हणजे अशोक चव्हाण यांच्या मिरवणुकीतील झेंड्याने रंग बदलला होता. झेंडा भाजपचा आणि कार्यकर्ते काँग्रेसचे असेच काहीसे चित्र कालच्या मिरवणुकीत दिसले.

गेल्या चार दशकांपासून नांदेड मराठवाडा आणि राज्यात आपले वर्चस्व राखत दोन वेळा मुख्यमंत्री, खासदार आणि प्रदेश तसेच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महत्त्वाची पद भूषवल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचा राग नांदेडकरांमध्ये ठासून भरला असेल असे बोलले जात होते. मात्र राज्याच्या राजकारणात काही राजकीय नेते असे असतात, ज्यांच्यासाठी पक्ष गौण असतो त्यापैकीच एक म्हणजे अशोक चव्हाण.

कडक शिस्तीच्या गुरु तथा वडील दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल केलेल्या अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यावर किती प्रभाव आहे हे कालच्या त्यांच्या मिरवणुकीतून दिसून आले.अशोक चव्हाण यांचे स्वागत करण्यात भाजप पेक्षा ते ज्या पक्षातून आले त्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि समर्थकांचीच गर्दी जास्त होती.

अशोक चव्हाण यांनी अचानक भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन दिवस नांदेड शहरात काँग्रेसचे जिल्हा कार्यालय तसेच अशोक चव्हाण यांचे निवासस्थान, त्यांच्या समर्थक माजी आमदार, मंत्री, पदाधिकाऱ्यांची संपर्क कार्यालय ओस पडली होती. यावरून अशोक चव्हाण यांना जिल्ह्यातून फारसा प्रतिसाद मिळणार नाही,असे बोलले जात होते. मात्र काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर दहा दिवसांनी नांदेडला परतलेल्या अशोक चव्हाण यांच्या स्वागतात त्यांच्या जुन्या पक्षातील सहकाऱ्यांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक मात्र, झाले अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात दोन गट पडल्याचे चित्र स्पष्टपणे दिसले. एक म्हणजे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा तर दुसरा आता अशोक चव्हाण यांचा. त्यामुळे येणाऱ्या काळात या एकाच पक्षात असलेल्या दोन नेत्यांची राजकीय वाटचाल कशी राहील, यावरच आगामी लोकसभा निवडणुकीतील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा नांदेडमध्ये आले मात्र, त्यांच्या स्वागताला जिल्ह्याचे खासदार प्रताप चिखलीकर नव्हते. ते अहमदपूर येथे नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये स्वागत करणे टाळले अशीही चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT