Nanded Political News: नाही नाही म्हणता म्हणता अखेर दहा दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा 'हात' सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेच. चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. महाविकास आघाडीला धक्का बसला. या सगळ्या राजकीय घडामोडीत आपली कर्मभूमी असलेल्या नांदेडपासून दूर असलेले अशोक चव्हाण येत्या 23 तारखेला जिल्ह्यात परतत आहेत. (Ashok chavan Nanded Daura)
आता पक्ष आणि भूमिका बदललेल्या अशोक चव्हाण यांचे जिल्ह्यात कसे स्वागत होते ? यावरूनच त्यांची खरी ताकद कळणार आहे. अशोक चव्हाण जेव्हा-जेव्हा नांदेडला येतात, तेव्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले आहे. नांदेडशी अशोक चव्हाण यांचे एक अतूट नाते राहिले आहे. नांदेड शहर व जिल्ह्यातील विकासकामांना त्यांनी गती दिली आहे, पण शहर व जिल्ह्यासाठी जे केले ते काँग्रेसमध्ये असताना. आता त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडल्यानंतर ते आपल्या कर्मभूमीत शुक्रवारी येणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशोक चव्हाण नांदेडला आल्यावर त्यांच्या स्वागताला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते किती जातात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आजही तळ्यात मळ्यात आहेत. हे कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात हा चर्चेचा व उत्सुकतेचा विषय झाला आहे. ते स्वागताला जाणार आहेत की नाही ? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेश करून दहा दिवस उलटून गेले आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, आता ते खासदार झाले आहेत. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा व आता राज्यसभा सदस्य या चारही सभागृहाचे सदस्य असलेल्या काही मोजक्याच नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश झाला आहे.
नांदेड शहर व जिल्ह्याच्या राजकारणावर चव्हाण कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसला बळ देणारा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख. या जिल्ह्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले आहेत. नांदेड शहरात काही दिवसांपूर्वी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आगमन झाले.
ते नांदेडला आल्यानंतर त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू केली. तर दुसरीकडे माजी आमदार अमिता चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधने सुरू केले आहे.
नांदेड शहरात डॉ. शंकरराव चव्हाण व कुसुम चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे आयोजन चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अशोक चव्हाण नांदेडला येणार आहेत. ते नांदेडला आल्यावर काय बोलणार, कोणाशी संपर्क करणार, भाजप प्रवेशाबद्दल कोणती भूमिका मांडणार ? या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.