BJP News : बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कापल्यापासून राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या माजी खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांच्यावर पक्षाने नुकतीच नवी जबाबदारी सोपवली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीनंतर प्रीतम मुंडे या नव्या उत्साहाने कामाला लागल्याचे दिसून आले.
माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरचा शनिवारी(ता.25) दौरा करत त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि स्वागत स्वीकारत त्यांनी धडाक्यात कामालाही सुरूवात केल्याचे दिसून आले. संभाजीनगर पश्चिम भागातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पक्षाची ताकद वाढवण्याला माझे प्राधान्य राहील.
केंद्र व राज्य सरकारचे लोकोपयोगी कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासह पक्षाला संघटनात्मक बळकटी देण्यासाठी आपण ताकदीने काम करू, अशी ग्वाही प्रीतम मु्ंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्यासह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर विधान परिषद, राज्यसभेवर त्यांना पाठवले जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. परंतु त्यांचा तेव्हा भ्रमनिरास झाला. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपाने 2024 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून पंकजा मुंडे यांनाच मैदानात उतरवले.
पण संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे पानीपत झाले, बीड लोकसभेची जागाही अवघ्या सहा हजार मतांनी पंकजा मुंडे हरल्या. या पराभवानंतर पक्षावर पंकजा आणि प्रीतम या दोन्ही बहिणीचे राजकीय पुनर्वसन करण्याची वेळ आली. दरम्यान, पक्षाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेत त्यांना मंत्री केले. परंतु, प्रीतम मुंडे या दुर्लक्षितच राहिल्या.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच महाराष्ट्रातील पक्षाच्या 74 जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली. त्यामध्ये प्रीतम मुंडे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. संघटनात्मक दृष्ट्या ही मोठी जबाबदारी समजली जाते. या नव्या भूमिकेमुळे प्रीतम मुंडे यांचे समर्थकही सुखावले. स्वत: प्रीतम मुंडे या नव्या जबाबदारीवर खूष आहेत. प्रभारी पद मिळताच त्या जिल्ह्याचा दौरा करणाऱ्या त्या पहिल्या ठरल्या आहेत.