Ambadas Danve On BJPs Kawad Yatra Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Kawad Yatra : भाजपाची कावड यात्रा राजकीय, आमची धार्मिक! अंबादास दानवेंचा निशाणा..

Ambadas Danve Criticizes BJP: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय केनेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा लक्षात घेत कावड यात्रेचे आयोजन केल्याचे बोलले जाते.

Jagdish Pansare

Shivsena-BJP Politics : श्रावणामध्ये कावड यात्रा काढण्याची राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. काही पक्ष सातत्याने कावड यात्रा काढतात, तर काही जण नव्याने ही यात्रा काढत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खडकेश्वर ते हर्सूल अशी कावड यात्रा सुरू केली होती. कोरोनापासून ही यात्रा बंद आहे. आता भाजपाचे विधान परिषदेतील आमदार संजय केनेकर यांनी कावड यात्रा आयोजित केली आहे. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाने कावड यात्रेची जय्यत तयारी केली. मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे.

मुख्यमंत्री येणार नसले तरी नियोजित कावड यात्रा शहरातील टीव्ही सेंटर येथून निघून खडकेश्वर येथे जाणार आहे. शिवसेनेची बंद असलेली कावड यात्रा आता भाजपाने हायजॅक केल्याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. अंबादास दानवे यांनी 'सरकारनामा' कडे या कावड यात्रेवर प्रतिक्रिया देताना भाजपाची कावड यात्रा राजकीय आहे, तर आमची धार्मिक भावनेतून हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी काढली जात होती. कोरोना काळापासून हा उपक्रम काहीसा मागे पडला असला तरी तो आम्ही बंद केलेला नाही, असे दानवे (Ambadas Danve) यांनी स्पष्ट केले.

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यासह राज्यभरात अनेक गावात महापूर, ढगफुटी होऊन लोक दगावली आहेत. जनावरे वाहून गेली, शेती खरडून निघाली, पिकांचे आतोनात नूकसान झाले, घरादारांची पडझड झाली. (Sanjay Kenekar) राज्यावर हे संकट ओढावलेले असताना कावड यात्रा कसली काढता? असा सवालही अंबादास दानवे यांनी भाजपाच्या नेत्याना केला आहे. आम्ही एखादा उपक्रम सुरू केला, की तो चोरायचा असाच हा प्रकार असल्याचे दानवे म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय केनेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा लक्षात घेत कावड यात्रेचे आयोजन केल्याचे बोलले जाते. महापालिकेच्या नव्या जलशुद्धीकरण योजनेचे उद्घाटन आणि कावड यात्रेत सहभाग असा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आखण्यात आला होता. परंतु जाहीर झालेला मुख्यमंत्र्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आणि कावड यात्रेतील उत्साह काहीसा मावळला. ठरल्याप्रमाणे ही कावाड यात्रा निघणार असली तरी यावरून आता राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळते.

महापालिका सत्तेचे 'कवाड' उघडणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय केनेकर यांना विधान परिषदेवर संधी दिल्यापासून संजय केनेकर यांनी आक्रमक होत प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू झाला तेव्हा, ही कबर ज्या खुलताबादमध्ये आहे, त्या गावाचे नाव रत्नपूर करा, अशी मागणी केनेकर यांनी लावून धरली. एवढेच नाही, तर ज्या औरंगजेबाला मराठ्यांनी महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या खुलताबादेत गाडला, त्याच गावाचे नाव रत्नपूर करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणीही केनेकर यांनी केली.

मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास करताना आपला इतिहास आणि संस्कृती याचे ज्ञान नव्या पिढाला व्हावे, धर्माभिमानी संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेला त्याग, त्यांच्यावर झालेले अत्याचार यातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी, हा या मागचा हेतू असल्याची भूमिका संजय केनेकर यांनी अनेकदा मांडली. याच हिंदुत्ववादी भूमिकेतून त्यांनी शहरातून कावड यात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने केलेला हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे येणारा काळच ठरवेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT