सचिन पवार
Vidhan parishad News : मराठवाडा अन् छत्रपती संभाजीनगरची भूमी ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी आहे. नव्या पिढीला हा जाज्वल्य इतिहास कळाला पाहिजे. विकास तर साधायचाच आहे, पण इतिहासाच्या खाणाखुणा पुसून नाही. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी पराक्रम, धर्मरक्षणासाठी दिलेला लढा हा तरुण पिढीला माहित होण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट मत विधान परिषदेतील भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी व्यक्त केले. एक वर्ष उशीरा स्वातंत्र्य मिळालेल्या मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेषही भरून काढायचा आहे, त्यासाठी लढा देणार असल्याचे केनेकर म्हणाले.
'सकाळ'च्या 'माझा मतदार, संघ माझी भूमिका'या उपक्रमात ते बोलत होते. निजाम राजवटीखाली वाढलेल्या मराठवाड्याला देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्ष उशिराने स्वातंत्र्य मिळाले. या प्रदेशाच्या नशिबी सातत्याने दुष्काळ आला. स्वातंत्र्यानंतर एवढी वर्षे होऊनही मराठवाड्याचा (Marathwada) हवा तसा विकास झालेला नाही. यामुळे मराठवाड्याच्या विकासाचा रोड मॅप तयार असून, हा अनुशेष भरून काढण्यासाठी लढा देत राहणार.
देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. परंतु, मराठवाड्यासारखा भाग निजाम राजवटीखालीच होता. वर्षभराच्या लढ्यानंतर स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश झाला. (Sanjay Kenekar) प्रादेशिक रचना असेल किंवा नशीब म्हणा या प्रदेशाच्या नशिबात कायम दुष्काळ आला. त्यामुळे स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षे लोटल्यानंतरही या प्रदेशाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. येथील रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, कृषी, रोजगार या विविध विषयांसंबंधीचे प्रश्न असतील, काही प्रमाणात सुटले. काही अजूनही तसेच आहेत.
हे सर्व प्रश्न सुटावेत यासाठी विधान परिषदेचा आमदार म्हणून सभागृहात कायम लढा देत राहील. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळायला हवे, अशी माझी भूमिका आहे. त्यासाठी सभागृहात कायम हा विषय मांडत असतो. समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी येथील नेत्यांना साथीला घेत, आम्ही लढा देत राहणार, असे संजय केनेकर म्हणाले.
शहराची तहान लवकरच भागेल..
एकीकडे मराठवाड्याची बाजू सांभाळताना दुसरीकडे ज्या शहराचा मी रहिवासी आहे, या शहरासाठीही माझा लढा सुरू राहील. शहराची 2 हजार 740 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री असतील किंवा सहकारी मंत्री यांच्या सहकार्याने कायम बैठका घेऊन, योजनेला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच ही योजना पूर्णत्वास येऊन छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे..
मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून आला होता. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्यदिव्य असे स्मारक व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करीत असून, लवकरच याला मान्यता मिळून येथे भव्य स्मारक तयार होईल. हे स्मारक पाहण्यासाठी संपूर्ण देशातून लोक येथे यायला हवेत, अशी आमची अपेक्षा आहे. मराठवाड्याचा समतोल विकास साधतांना इतिहास आणि संस्कृतीही जपली पाहिजे, ही यामागील भावना आहे.
मागील काही काळात शहरात मोठ्या प्रमाणावर कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. शेंद्रा-बिडकीन क्षेत्रात तब्बल 52 हजार कोटी रुपयांचे उद्योग आले. येत्या काळात आणखी काही मोठ्या कंपन्या या औद्योगिक वसाहतीत याव्यात यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जेणेकरून येथील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. परिणामी, त्यांना रोजगारासाठी शहर सोडण्याची गरज भासणार नाही. दुसरे म्हणजे, उद्योग आले की त्यांना पायाभूत सुविधा किंवा अन्य काही गोष्टींची उपलब्धता झाली नाही की ते परत जातात. परंतु, आता शहरात गुंतवणूक झालेल्या कंपन्यांना ज्या आवश्यक बाबी, पूरक व्यवस्था आवश्यक असतील त्या आम्ही पूर्ण करणार असल्याचे केनेकर यांनी सांगीतले.
छत्रपती संभाजीनगर-पुणे 'एक्स्प्रेस वे'ला गती
शहराच्या आसपास नवीन, महत्त्वाच्या आणि मोठ्या रस्त्यांचे जाळे तयार होत आहे. यात धुळे-सोलापूर, समृद्धी यांसारख्या महामार्गांचा सामावेश आहे. यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. असाच एक शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस वे लवकरात लवकर व्हावा, यासाठी पाठपुरवठा करत आहे. या अनुषंगाने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मराठवाडा वैज्ञानिक मंडळाचे पुनरुज्जीवन, शहरात केसर आंबा संशोधन केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न व अन्य काही चांगल्या संस्था शहरात आणता याव्यात यासाठी काम करणार असल्याचे केनेकर यांनी यावेळी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.