Ashok Chavan - Ajit Pawar
Ashok Chavan - Ajit Pawar  Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : 'भाजपवासी' अशोक चव्हाणांना भावला अजितदादांचा अर्थसंकल्प..!

Jagdish Pansare

Nanded News : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता भाजपचे राज्यसभेत खासदार असलेले अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक केले आहे. महायुती सरकारच्या काळातील शेवटच्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशानात शुक्रवारी (ता.28) अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प सादर केला.

विरोधकांनी घोषणांचा पाऊस, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखवलेले गाजर, अशा शब्दात टीका केली असली तरी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मात्र अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प चांगलाच भावला. अजित पवार यांनी ग्रामीण आणि शहरी भागाला समतोल न्याय दिल्याचे सांगत त्यांनी महायुती सरकारचे कौतुक केले.

महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसह महिला व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शहरी व ग्रामीण भागाला समतोल न्याय दिला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिलमाफी, आधारभूत किमतीनुसार कडधान्ये व तेलबियांच्या खरेदीसाठी शंभर कोटी रुपयांचा फिरता निधी, कापूस व सोयाबीनचे भाव घसरल्याने दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5 हजार रुपयांची आर्थिक मदत, ई-पंचनामा योजना आदी घोषणांमधून दिलासा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर, बचत गटांच्या निधीत वाढ, महिलांसाठी 10 हजार पिंक रिक्षा आदी निर्णयातून महायुती सरकारने महिलांना भरीव मदत करण्याची भूमिका घेतली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्त्यात 38 हजारांवरून 60 हजार रुपयांपर्यंत वाढ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदीतून तरूण विद्यार्थ्यांना साह्य होणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोलियम उत्पादनांवरील करांमध्ये कपात, संजय गांधी निराधार योजनेत 1 हजार रुपयांऐवजी दीड हजार रुपयांचे अनुदान आदींमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे. एरवी मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली अशी प्रतिक्रिया देणारे अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले. पक्षाने त्यांना 48 तासांत राज्यसभेवर पाठवत खासदार केले. दोन महिन्यांपूर्वी विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या अशोक चव्हाण यांची भाषा आता मात्र बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT