Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : 'एरवी हिमतीने लढणारी मी...' पंकजा मुंडे गहिवरल्या !

Chaitanya Machale

Beed News : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा झालेल्या पराभवामुळे बीड लोकसभा मतदारसंघातील मुंडे यांच्या कट्टर समर्थकांनी आत्महत्या केल्या. या सर्व घटनांमुळे मुंडे हळव्या झाल्या आहेत. लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने मला आता अपराधी वाटत आहे. एरवी मी हिमतीने लढणारी आहे. मात्र, या सर्व घटनांमुळे सध्या मी प्रचंड डगमगली आहे, अशा शब्दात मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

बीड (Beed) लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाचा धक्का पंकजा यांचे कट्टर समर्थक असलेले पांडुरंग सोनवणे यांना बसला. याच नैराश्यातून सोनवणे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा येथील पांडुरंग सोनवणे यांच्या घरी जाऊन सोमवारी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. माझ्या पराभवानंतर निराश झालेले लोक स्वत:चे प्राण देत आहेत. लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने सध्या मला अपराधी वाटत असल्याचे मुंडे म्हणाल्या.

सोनवणे यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन बाहेर पडलेल्या पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी हिंमतीने लढणारी आहे. पण आत्महत्यांच्या घटनांमुळे प्रचंड डगमगली आहे. आत्महत्यासारख्या गोष्टींचे समर्थन मी करणार नाही. मी लोकांना आवाहन करते, आत्महत्येसारखे पाऊल त्यांनी उचलू नये.परिवाराला आपल्या लहान लेकरांना वाऱ्यावर सोडून असे आत्महत्या करणे हे मला पसंत पडणार नाही. शपथ आहे तुम्हाला, या निराशेतून बाहेर या, जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असला पाहिजे. तुमचा आक्रोश आणि प्रेम तुमच्या वर्तवणुकीतून, कामातून आणि कष्टातून व्यक्त करा, असे आवाहन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले.

राजकारणात विजय-पराजय हे सुरु असते. पण सध्या राजकारण ज्या पद्धतीने आकार घेत आहे. त्यामुळे अनेक लोक आता निराशेच्या गर्तेत कोसळत आहेत. आम्ही कमी आहोत, आम्ही राजकारणाच्या प्रवाहात काहीच बदलू शकत नाही, असा न्यूनगंड लोकांमध्ये तयार होत आहे. ज्या पद्धतीने राजकारण बदलत आहे, या भावना लोकांना आक्रोशाकडे नेत आहेत. मात्र त्यावर आत्महत्या करणे हा उपाय नाही. आपल्या परिवाराला, कुटूंबाला असे वाऱ्यावर सोडून पाऊल उचलणे हे कितपण योग्य आहे, अशी विचारणाही पंकजा मुंडे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT