Nanded Politics Bjp News :
भारतीय जनता पक्षात अलिकडच्या काळात आयारामांची संख्या खूप वाढली आहे. या इतर पक्षांतून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वाचे पद देण्यात येत आहेत. गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मात्र अडगळीत टाकण्यात येत असल्याची भावना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये वाढीला लागत आहे. Nanded चे जिल्हाध्यक्ष हे काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपत आले आहेत. सध्या या आयारामांना अच्छे दिन आल्याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पार्टी विथ डिफ्रन्स असे बिरूद मिरवणाऱ्या भाजपतील पदाधिकारी व कार्यकर्ते पाहिले तर पार्टी विथ ऑल असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी असल्याने जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शोधून काढावे लागत आहे. नांदेड जिल्हा उत्तरच्या अध्यक्षपदी सहा ते आठ महिन्यांपूर्वी सुधाकर भोयर यांची निवड करण्यात आली होती.
त्यांनी अखिल विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. संघटनात्मक पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी जिल्हाध्यपदाला गवसणी घातली होती. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या विरुद्ध काही पदाधिकाऱ्यांनी थेट नागपूरात जाऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांच्याकडे तक्रारी केल्या. अखेर त्यांची सहा महिन्यातच उचलबांगडी करण्यात आली.
आता या पदावर पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षात आलेल्या किशोर देशमुख यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. नांदेड महानगर अध्यक्षपदी दिलीप कंदकुर्ते यांची काही महिन्यापूर्वी निवड करण्यात आली आहे. ते भारतीय जनता पक्षात येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले असून ते नगरसेवकही होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर सध्या नांदेड शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नांदेड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे हे गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे. जिल्ह्यात भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी काम करत आहेत. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोस्टर लावणे, पोलींग एजंट, सतरंज्या उचलने, विविध आंदोलनात सहभाग तर नोंदवलाच पण वेळ प्रसंगी पोलिस कारवाईत त्यांना जेलमध्येही जावे लागले.
जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाणारे निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्तेच बाजूला पडले आहेत. एका कोपऱ्यात बसून उपऱ्यांची संख्या मोजण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. जसे जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले आहेत तशीच परिस्थिती तालुका अध्यक्ष, विविध आघाड्यांच्या नियुक्ती बाबत आहे. यापुढे तरी ह्या जुन्या कार्यकर्त्यांना पक्ष बळ देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.