MLC Election : विधानपरिषदेच्या जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांचा दणदणीत विजय झाला. दोन्ही जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने 454 मतांसह शिरसाट यांनी बाजी मारली. राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुहास शिरसाट यांना आधीच अनपेक्षितपणे उमेदवारी मिळाली होती. आता त्यांच्या विजयाने 'बागडे नानांचा' आपल्या या फुलंब्री मतदारसंघावरील कंट्रोल आता अधिक मजबूत होणार आहे.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर हरिभाऊ बागडे यांचे बारकाईने लक्ष आहे. राजस्थानचे राज्यपाल असले तरी महाराष्ट्रात आल्यानंतर हरिभाऊ बागडे हे आपला सर्वाधिक वेळ हा फुलंब्री मतदारसंघात घालवतात. 15 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राज्यपाल म्हणून निवड झाल्यानंतर फुलंब्री मतदारसंघात त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण चालवणार? असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सुहास शिरसाट यांचे नाव प्रामुख्याने विधानसभेच्या उमेदवारीसाठी पुढे आले होते.
परंतु उमेदवारी देण्यासाठीच्या निकषानुसार बंद पाकिटातील नावांत सर्वाधिक पसंती अनुराधा चव्हाण यांच्या नावाला मिळाली आणि उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. उमेदवारीच्या रेसमध्ये असलेले सुहास शिरसाट तेव्हा नाराज झाले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनुराधा चव्हाण यांचे काम केले नाही, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. अर्थात अनुराधा चव्हाण या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. मात्र त्या आमदार झाल्यानंतरही मतदारसंघात शिरसाट विरुद्ध चव्हाण असा सुप्त संघर्ष पहायाल मिळाला.
आमदार अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री मतदारसंघाची धुरा हाती घेतली खरी पण कारभार मात्र त्यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण हेच हाकतात असा आरोप विरोधकांकडून केला जातो. निवडणुकीत काम न करणाऱ्या पक्षातीलच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघातील कामे देतांना डावलले जाते, त्यात प्रामुख्याने सुहास शिरसाट समर्थकांवर अन्याय केला जात असल्याच्या तक्रारीही होत्या. फुलंब्री मतदारसंघातील या कुरबुरी आणि सुरु असलेले पक्षांतर्गत राजकारण याची इत्यंभूत माहिती राजस्थानमध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना पोहचवली जात होती.
बागडेंच्या हस्तक्षेपानेच शिरसाट यांना उमेदवारी?
फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण आमदार असताना दुसरीकडे सुहास शिरसाट समर्थकांमध्ये आपल्याला डावलले जात असल्याची भावन होती. फुलंब्री नगरपालिका निवडणुकीत सुहास शिरसाट यांचा पराभव झाल्यानंतर चव्हाण आणि शिरसाट यांच्यातील मतभेदाची दरी अधिकच वाढल्याचे बोलले जाते. यातून मार्ग काढण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी मार्ग शोधला. राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाली आणि जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा भाजपाकडे घेण्याचे ठरले.
जालना-संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यात भाजपा मोठा भाऊ ठरल्यामुळे संख्याबळाचा दाखला देत शिवसेनेवर स्थानिक नेत्यांनी दबाव वाढवला. दरम्यान, हरिभाऊ बागडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई आणि अहिल्यानगर येथे दोनदा भेट घेतली. या भेटीतच सुहास शिरसाट यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा शब्द मुख्यमंत्र्यांनी खाली पडू दिला नाही आणि चर्चेत नसलेल्या सुहास शिरसाट यांच्या गळ्यात थेट उमेदवारीची माळ पडली.
बागडे नाना यांनी सुहास शिरसाट यांना फक्त उमेदवारीच मिळवून दिली नाही, तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही मंत्री अतुल सावे, शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर सोपवली. शिवसेनेच्या हक्काची जागा त्यांना सोडावी लागल्याने पक्षात नाराजीचे वातावरण होते. मात्र या नाराजीचा परिणाम मतांवर होऊ नये याची काळजी वरिष्ठ पातळीवरून घेतली गेली. अखेर आज सुहास शिरसाट हे 454 मते घेऊन विजयी झाले.
सुहास शिरसाट यांच्या विजयातून एकाच दगडात दोन पक्षी मारण्यात आल्याची चर्चाही होताना दिसते आहे. अनुराधा चव्हाण यांच्यावर अंकुश ठेवतानाच फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील सत्तेचे विकेंद्रीकरण आणि त्याआधारे मतदारसंघावर कंट्रोल ठेवण्याचा बागडे नाना यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. भविष्यात या मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजी वाढीस लागून पक्षाचे राजकीय नुकसान होऊ नये असा प्रयत्न बागडे नाना यांचा असणार आहे. सुहास शिरसाट यांना थेट विधान परिषदेवर पाठवत बागडे नाना यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.