

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या १७ जागांच्या निकालानंतर राज्याच्या वरिष्ठ सभागृहातील गणिते पूर्णपणे बदलली असून, सत्ताधारी महायुतीने विरोधकांचा पार धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीनंतर भाजपने विधानपरिषदेत आपली ताकद कमालीची वाढवली असून, महायुतीने तब्बल ५० पार (राज्यपाल नियुक्त जागांसह ५७) आकडा गाठला आहे. या सर्व यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूक्ष्म नियोजन आणि पडद्यामागचे राजकीय डावपेच पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचे अधोरेखित झाले आहे.
निकालांनंतर विधानपरिषदेतील नवे पक्षीय बलाबल:
या निवडणुकीच्या निकालानंतर वरिष्ठ सभागृहातील दोन्ही आघाड्यांचे चित्र खालीलप्रमाणे स्पष्ट झाले आहे:
महायुती (५७)
भाजप: ३२ + ३ (राज्यपाल नियुक्त) = ३५
शिवसेना : ९ + २ (राज्यपाल नियुक्त) = ११
राष्ट्रवादी काँग्रेस : ८ + २ (राज्यपाल नियुक्त) = १०
अपक्ष (गोकुळ गिते - नाशिक): १
----------------------
एकूण निवडून आलेले: ५०
राज्यपाल नियुक्त जागांसह एकूण ताकद: ५७
---------------------
महाविकास आघाडी (१५)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): ६
काँग्रेस: ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार): २
अपक्ष (सुधाकर आडबाले, किरण सरनाईक): २
---------------------
एकूण: १५
---------------------
अपक्ष (सत्यजीत तांबे) - 1
मविआच्या पराभवाची 'हॅटट्रिक': विधानसभेपासून विधानपरिषदेपर्यंत कोंडी
या संपूर्ण पडझडीची सुरुवात विधानसभा निवडणुकीपासूनच झाली होती. विधानसभेत भाजपने स्वबळावर तब्बल १३२ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकत मविआला बॅकफूटवर ढकलले. त्यात ५ अपक्षांनीही महायुतीला पाठिंबा दिला. या अभूतपूर्व बहुमताने मविआची ताकद आधीच खिळखिळी केली होती.
विधानसभेपाठोपाठ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीने, विशेषतः भाजपने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. परभणी आणि भिवंडी-निजामपूर या दोन महापालिका, काही नगरपालिका आणि सांगली जिल्हा परिषद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीने आपला भगवा फडकावला. ग्रामीण आणि शहरी दोन्ही मतदारांनी मविआला नाकारल्याचे हे स्पष्ट संकेत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील याच प्रचंड ताकदीच्या जोरावर भाजपने विधानपरिषद निवडणुकीत १७ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला. शिवसेनेने ३ आणि राष्ट्रवादीने २ जागा जिंकल्या. मविआकडे कागदावरही कुठे संख्याबळ जुळत नव्हते. त्यामुळे ६ जागा आधीच बिनविरोध काढण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले होते. त्यापाठोपाठ अमरावतीत काँग्रेसच्या हर्षजित देशमुख, नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कृष्णा पाटील आष्टेकर यांनी मतदानापूर्वीच महायुतीशी छुपी हातमिळवणी केली होती.
नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला असला, तरी तिथे विजयी झालेले अपक्ष गोकुळ गिते हे मूळचे भाजपचेच बंडखोर आहेत. त्यामुळे नाशिकची जागा थेट महायुतीच्याच खिशात गेली आहे. बंडखोरांना रसद पुरवून जागा सुरक्षित ठेवण्याची फडणवीसांची चाल इथे यशस्वी ठरली.
उर्वरित ठिकाणी म्हणजे नागपूर, भंडारा-गोंदिया, सोलापूर, जळगाव, लातूर-बीड-धाराशिव, औरंगाबाद-जालना याठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार केवळ प्रतिकात्मकच ठरले होते. त्यांना महायुतीच्या उमेदवारांसोबत स्पर्धाच करता आली नाही. उलट महाविकास आघाडीचीच मते अनेक ठिकाणी फुटली. केवळ परभणी-हिंगोली आणि सांगली-सातारा इथे लढाई झाली पण तिथेही महायुतीचा विजय होईल असा अंदाज सुरुवातीपासूनच होता. त्यामुळे १७ पैकी १७ जागांवर महायुतीची रणनीती १०० टक्के यशस्वी ठरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.