Abhimanyu Pawar-Sambhaji Patil Nilangekar  Sarkarnama
मराठवाडा

Latur politics : फडणवीसांनी वेटिंगवर ठेवलेल्या दोन आमदारांचे गळ्यात गळे...!

राम काळगे

Nilanga News : आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जलसाक्षरता रॅलीचा उद्देश कितपत सफल झाला, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, राजकीय उद्देश साध्य झाल्याचे दिसत आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तालुक्यात या रॅलीचे बुधोडा येथे स्वागत केले. आमदार निलंगेकर हे आमचे नेते असून, या अभियानाला आपला पाठिंबा असल्याचे पवार यांनी जाहीर केले. गेल्या काही वर्षांत या दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद दूर झाले, की राजकीय अपरिहार्यता म्हणून ते एकत्र आले, हे आगामी काळात लक्षात येईल. (BJP's Sambhaji Patil Nilangekar and Abhimanyu Pawar met)

दरम्यान, हे दोन्ही आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. मागील सरकारच्या काळात संभाजी निलंगेकर हे राज्याच्या मंत्रिमंडळात होते. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये लातूरमधून हे दोघे मंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र, फडणवीसांनी दोघांनाही ‘वेटिंग’वर ठेवले आहे. मध्यंतरी भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांनी अभिमन्यू पवार यांच्या मंत्रिपदाबाबत भाष्य केले होते. त्यामुळे या दोघांच्या भेटीची चर्चा लातूरमध्ये चवीने चर्चिली जात आहे.

अभिमन्यू पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव होते. औसा मतदारसंघ हा शिवसेनेचा. फडणवीस यांनी हा मतदारसंघ भाजपसाठी सोडवून घेत २०१९ मध्ये पवार यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पवार यांच्या उमेदवारीला निलंगेकरांच्या गोटातून विरोध झाला होता. तरीही पवार हेच उमेदवार राहिले. त्यावेळी भाजपमध्ये असलेले बजरंग जाधव यांनी या मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. यामागे निलंगेकरांचाच हात होता, अशी चर्चा होती. त्या निवडणुकीत पवार यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील (मुरुमकर) यांचा पराभव केला होता. त्यानंतर या दोघांतील मतभेद अधूनमधून समोर येत होते.

लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी पाणी मिळावे, पाणी वापराबाबत लोकांमध्ये जागरूकता यावी, यासाठी आमदार निलंगेकर यांनी गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात दुचाकीवरून जलसाक्षरता रॅली काढली आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. औसा तालुक्यात या रॅलीचे स्वागत आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. निलंगेकर आमचे नेते आहेत, असेही ते म्हणाले. मतभेद दूर झाले, की ही पवारांची राजकीय अपरिहार्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली.

निलंगेकरांच्या रॅलीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले आहे. तसा संदेश त्यांनी व्हिडिओद्वारे दिला आहे. शिवाय निलंगा तालुक्यातील ६८ गावे औसा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत. या गावात निलंगेकरांचा प्रभाव आहे. फडणवीस यांनी केलेले कौतुक आणि ही ६८ गावे ही पवारांची राजकीय अपरिहार्यता मानली जात आहे. कारण काहीही असले तरी या दोन्ही नेत्यांचे एकत्र येणे पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी सुखद असेच आहे.

हक्काचे पाणी पदरात पाडून घेऊ : निलंगेकर

मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यात पाण्याअभावी विकास होऊ शकलेला नाही. विकासाचे नंदनवन फुलवायचे असेल तर हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळालेच पाहिजे, असे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी औसा तालुक्यात विविध गावांमध्ये जलसाक्षरता रॅलीदरम्यान व्यक्त केले. हा लढा राजकारणासाठी किंवा जातीसाठी नाही. मतदार जोडण्यासाठीही नाही, तर आपले हक्काचे पाणी मिळावे यासाठी आहे. पाणी हा प्रत्येकाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी पाणी आवश्यकच आहे. या माध्यमातून हक्काचे पाणी पदरात पाडून घेऊ, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT