Loha Nagar Parishad Election News Sarkarnama
मराठवाडा

BJP News : भाजपने रेकाॅर्ड मोडला, लोहा नगरपरिषदेत पदाधिकाऱ्यासह पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, मेहुण्यालाही उमेदवारी!

Marathwada Local Body Election 2025 : भाजपने गजानन सूर्यवंशी यांना नगराध्यक्ष पदासाठी तर नगरसेवकपदासाठी पत्नी गोदावरी, भाऊ सचिन, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांना उमेदवारी दिली.

Jagdish Pansare

Loha Nagar Parishad Election News : म्हणे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण उमेदवारी देताना मात्र स्थानिक नेत्यांनी घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. पत्नी, बहीण, मुलगा, पुतण्या, वहिनी, भाचा अशा नात्यागोत्यातील अनेकांना निवडणुकीत उतरवत सत्ता केंद्र आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. भाजपने तर कहरच केला, एक नव्हे, दोन नव्हे तर एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना नगरपरिषदेची उमेदवारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेमध्ये गजानन सूर्यवंशी या आपल्या पदाधिकाऱ्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. तर नगरसेवक पदासाठी त्यांच्या पत्नी, भाऊ, भावजय, मेहुणा, भाच्याची पत्नी अशा सहा जणांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. या प्रकारानंतर स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून आम्ही सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल सामान्य कार्यकर्ता करतांना दिसतो आहे.

लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी का दिली असेल? इतर पक्षांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या भाजप पक्षाला ही घराणेशाही मान्य आहे का? अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे. लोहा नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नगरसेवकपदासाठी सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी, भाऊ सचिन, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना उमेदवारी दिली.

'पार्टी विथ डिफरन्स' चा दावा करणाऱ्या भाजपचे हेच का पार्टी विथ डिफरन्स, अशी विचारणा आता होत आहे. आता मतदार ही घराणेशाही स्वीकारतात? की मग यांना धडा शिकवतात? हे लवकरच स्पष्ट होईल. लोहा नगरपरिषदेत भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा हा बाल्लेकिल् म्हणून ओळखला जातो.

लोहा नगरपरिषदेत एकूण 10 प्रभाग असून 20 नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गटासह सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपने सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे.

नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी, पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना (प्रभाग 7 अ) मधून, भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी (प्रभाग क्रमांक 1 अ) मधून, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग 8 अ) मधून, मेव्हुणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक 7 ब) मधून तर भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे (प्रभाग क्रमांक 3) मधून उमेदवारी आहे. भाजप प्रमाणेच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत आपल्या भावजयीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. सिल्लोडमध्ये दुसरे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुलाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. मराठवाड्यासह राज्यात अशी अनेक उदाहरणं समोर येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT