Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देताना सरकारच्या विरोधात नांदेड बंदचे आवाहन नुकतेच करण्यात आले होते. यासाठी मराठा आंदोलकांनी शहरातील महात्मा फुले चौकातून रॅली काढली होती. या रॅलीत सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर हे आले होते. परंतू आंदोलकांनी या दोघांना तिथून पिटाळून लावले. मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा न दिल्यामुळे आंदोलकांच्या रोषाला या दोघांना सामोरे जावे लागले होते. काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी पिटाळून लावल्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर यांनी काल थेट अंतरवाली सराटीत धाव घेतली. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या लढ्याला आपला कायम पाठिंबा असल्याची ग्वाही दिली.
अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेत मराठा समाजाच्या न्याय्य आरक्षणाच्या मागणीला ठाम पाठिंबा व्यक्त केला. समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या संघर्षात समाजासोबत ठाम उभे होतो, आहोत आणि यापुढेही राहू असा विश्वास या दोन्ही आमदारांनी जरांगे पाटील यांच्या भेटीत व्यक्त केला.
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारच्याविरोधात बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी सापडलेल्या प्रत्येक मराठा बांधवाला मराठा-कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करत जरांगे पाटील गेल्या दहा दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत.
दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मराठवाड्यात ठिकठिकाणी रास्तारोको, निदर्शने, आंदोलने झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये बंदचे आवाहन देखील करण्यात आले होते. नांदेड बंद दरम्यान संतप्त मराठा आंदोलकांनी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर यांना रॅलीतून बाहेर काढल्याचे सांगितले जात होते. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलक आक्रमक झाल्याने या दोघांनी तिथून निघून जाणे पसंत केले.
दरम्यान, आम्हाला हाकलले नाही तर आम्ही आमच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे तिथून स्वतःच निघून गेलो, असा दावा आमदार आनंद बोंढारकर यांनी केला होता. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणता आमदार, खासदार, मंत्री बोलत नाही त्याकडे लक्ष ठेवा? असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते.
मराठा समाजाची नाराजी भविष्यात परवडणार नाही, हे लक्षात आल्याने बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर यांनी काल थेट अंतरवाली गाठत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. रात्री उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मनोज जरांगेंची त्यांनी भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील त्यांच्या मागण्या व भूमिका सविस्तरपणे समजून घेतल्या. तसेच त्यांच्या या संघर्षाला पाठिंबा दिला. यावेळी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याची विनंती केली.
मराठा समाजाच्या भावना, अपेक्षा आणि प्रश्न हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांना योग्य तो न्याय मिळावा, हीच अपेक्षा, असल्याचे आनंद बोंढारकर यांनी भेटीनंतर म्हटले आहे. या भेटीदरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, युवासेना जिल्हाप्रमुख बाळू पाटील मोरे, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष नारायण कदम, तालुकाप्रमुख गणेश बोकारे, धनंजय पावडे, ओमकार सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.