Imtiaz Jalil-BRS Sarkarnama
मराठवाडा

BRS News : बीआरएस वाढवणार इम्तियाज जलील यांची डोकेदुखी; कट्टर विरोधकाला मैदानात उतरवणार

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : तेलंगणाची सत्ता गमवल्याच्या दुःखातून भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस सावरू लागला आहे. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आजारातून बरे झाले असून त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत लक्ष घातले आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न बीआरएसकडून सुरू झाला आहे.

इम्तियाज यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कदीर मौलाना (Kadir Maulana) यांना संभाजीनगरातून उमेदवारी देण्याचा विचार शनिवारी हैदराबाद येथे झालेल्या बीआरएसच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मराठवाड्यातील पक्षाचे प्रवीण जेठेवाड यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बीआरएसमध्ये (BRS) प्रवेश केलेल्या कदीर मौलाना यांचा राजकीय आलेख फारसा उंचावणारा नसला तरी एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांचे कट्टर वैरी अशी त्यांची ओळख आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्याच्या राजकारणात या दोन नेत्यांमध्ये अनेकदा संघर्ष झडल्याचेही दिसून आले आहे. इम्तियाज जलील यांना शिवसेना, भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा मोठा विरोध कदीर मौलाना यांनी केलेला आहे. अगदी या दोन नेत्यांमधील वाद विकोपाला जाऊन प्रकरण हातघाईवर गेल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशावेळी मौलाना यांना इम्तियाज जलील यांच्या विरोधात लोकसभेच्या आखाड्यात उतरवून बीआरएस त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मौलाना यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) किती प्रतिसाद मिळेल किंवा त्यांना मुस्लिम मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो यावरच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे गणित अवलंबून असणार आहे. गेल्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांची नौका वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने किनाऱ्याला लागली होती. यावेळी मात्र वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दलित मते इम्तियाज यांच्या वाट्याला येणार नाहीत, असे बोलले जाते.

अतिरिक्त मतांची जमवाजमव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इम्तियाज यांच्या मुस्लिम वोट बँकेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न मौलाना यांच्या उमेदवारीतून बीआरएस करणार आहे. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विस्तार सुरू केला, तेव्हा राष्ट्रवादीत बाजूला फेकले गेलेले कदीर मौलाना नव्या पर्यायाच्या शोधात होते. त्यांनी बीआरएसचा पर्याय स्वीकारला. के चंद्रशेखर राव यांनाही पक्षासाठी जिल्ह्यात एका मुस्लिम चेहऱ्याची गरज होती. मौलाना यांच्या पक्षप्रवेशामुळे काही प्रमाणात ती पूर्ण झाली.

मौलाना यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश सोहळे घडवून आणत जिल्ह्यात बीआरएसची वातावरणनिर्मिती केली. शहरातील रिक्षांवर पोस्टरबाजी करत मौलाना यांनी केसीआर यांचा विश्वास संपादन केला आहे. महाराष्ट्रातील बीआरएसच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये मौलाना यांचा समावेश असल्याने हैदराबादेतील केसीआर (KCR) यांच्या निवासस्थानी थेट प्रवेश असणारे नेते म्हणून मौलाना यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

तेलंगणा राज्यातील सत्ता गमावल्यानंतर बीआरएसच्या महाराष्ट्रातील पक्ष वाढीच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसीआर पुन्हा सक्रिय झाले असून मराठवाड्याच्या राजधानीत थेट विद्यमान खासदाराला आव्हान देण्याची तयारी या पक्षाने सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT