बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असतानाही पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे दौऱ्यावर न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन्ही मंत्री “हरवले” अशी पोलिसांकडे विनोदी तक्रार दाखल करून त्यांना शोधणाऱ्यास ११ रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
संजय सावकारे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की नियुक्तीनंतर त्यांनी बुलडाण्याचा दौरा केला असून आवश्यक बैठकाही घेतल्या आहेत.
Buldhana, 25 September : काही वर्षांपूर्वी राज्यात विहिरी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती (वास्तविक विहिरी चोरीला गेल्या नव्हत्या, तर खोदाई न करताच विहिरींची बिलं काढण्यात आली होती). त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ उडाला. आता तर चक्क पालकमंत्री चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही मंत्र्यांना शोधून देणाऱ्यांना अकरा रुपयांचे बक्षीससह जाहीर केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) हे बुलडाण्याचे पालकमंत्री आहेत, तर भाजपचे संजय सावकारे हे सहपालकमंत्री आहेत. मात्र, अतिवृष्टी काळात हे दोन्ही पालकमंत्री बुलाडाणा जिल्ह्यात फिरकले नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उपविभागीय पोलिस आधिकाऱ्यांना हे दोन्ही पालकमंत्री हरवल्याच्या तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. घरदरांत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. इतर जिल्ह्यातील पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत. मात्र, बुलडाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) हे बुलाडण्याकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाकडून बुलाडाण्याचे दोन्ही पालकमंत्री हरवले आहेत, अशी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, दोन्ही मंत्री हे फक्त एसी कार्यालयात बसून अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. वास्तविक मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली पाहिजे. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या शोध घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवावे, अशीही विनंती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दोन्ही पालकमंत्री हरवले आहेत. त्यांना शोधून आणणाऱ्यास सुमारे ११ रुपयाचे बक्षीसही या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. आता या तक्रारीनंतर तरी मंत्री मकरंद पाटील आणि संजय सावकारे हे बुलडाण्यात जाऊन शेतकऱ्यांना धीर देतील का?, याची उत्सुकता आहे.
याबाबत संजय सावकारे म्हणाले, संबंधितांचा काही तरी गैरसमज झालेला दिसत आहे. ज्या दिवशी सहपालकमंत्री म्हणून माझी नियुक्ती झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी बुलडाण्याला गेलो होतो. सर्व विभागाची बैठक घेतली. मी पदभार घेण्याच्या पाऊस झाला होता, त्याचे पंचनामे झाले आहेत. मी पदभार घेतल्यानंतर मलकापूर तालुक्यातील एकाच गावात अतिवृष्टी झाली होती, तेथेही जाऊन पाहणी केली होती. तेथील आमदारांशी बोललो. त्यांनी परिस्थिती सुरळीत असल्याचे सांगितले.
प्र: कोणत्या मंत्र्यांविरुद्ध “हरवल्याची” तक्रार दाखल करण्यात आली?
उ: पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे.
प्र: तक्रार कोणत्या पक्षाने केली?
उ: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने.
प्र: तक्रारीसोबत काय बक्षीस जाहीर करण्यात आले?
उ: दोन्ही मंत्र्यांना शोधून देणाऱ्यास ११ रुपयांचे बक्षीस.
प्र: संजय सावकारे यांनी काय स्पष्टीकरण दिले?
उ: नियुक्तीनंतर बुलडाण्याला जाऊन बैठक घेतल्याचे आणि परिस्थितीची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.