Buldhana News, 23 Apr : लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांत दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरूणांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
शिवाय या घटनांनमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे याचं वास्तव देखील समोर आलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील हरिष वानखडे या 28 वर्षीय युवकाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
तर चिखली तालुक्यातील मंगरूळ येथील सत्यपाल भिसे या 25 वर्षीय तरुणाने सुद्धा लग्न जुळत नसल्याने व्यसनाधीन होऊन झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. याच दोन प्रकरणावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी तरूणांना आत्महत्या करू नका आणि नैराश्य झटकून कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे.
जरांगे म्हणाले, "तरुणांनी आत्महत्या करू नये. पण काम केले नाही तर मुलगी कशी मिळेल? चांगली कामं करा, व्यवसाय करा, शेती कसायला शिका. शेतीत पैसा आहे पण शेतीला जोडधंदा करण्याची तयारी हवी. मुलांनो सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही," असं जरांगे यांनी तरूणांना आवाहन केलं.
तर यावेळी मराठवाडा आणि विदर्भातील शेतीला पाणी मिळालं तरच शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न सुटतील, असंही म्हटलं आहे. "आत्महत्या थांबवायच्या असतील आणि शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न व्हायची असतील, तर शेतीतून उत्पन्न मिळणं गरजेचे आहे. यासाठी शेती बागायती असणे गरजेचं आहे.
पश्चिम महाराष्ट्राला जसं पाणी आहे तसं पाणी विदर्भ आणि मराठवाड्याला नाही. उजनी आणि जायकवाडीचे पाणी वळवण्यासाठी केवळ पाट फिरवण्याची गरज आहे, पण सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरत आहे. त्यामुळे हा पाण्याचा मुद्दा देखील मी लावून धरणार आहे.
मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी मी खुप मोठं आंदोलन उभारणार आहे", असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढाईनंतर आता जरांगे पाटील यांनी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.