chandrakant khaire raju shinde sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire : राजू शिंदेंना ठाकरे गटात प्रवेश करताच चंद्रकांत खैरेंनी दिला 'हा' सल्ला; पण निशाणा दानवेंवर?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : तळ्यात-मळ्यात करत अखेर भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी पाच माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

त्यांच्या या पक्षप्रवेशाबद्दल स्वागत आणि अभिनंदन करताना शिवसेना नेते, चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी राजू शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. तो सल्ला देताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

"राजू तु शिवसेनेत प्रवेश केला, त्याबद्दल तुझे अभिनंदन, आता तुझ्या साथीने आपण गद्दाराला गाडूच. पण, गटबाजीत अडकू नको," अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यासमोरच पक्षातील गटबाजीचा जाहीरपणे उल्लेख केला. खैरे यांचा निशाणा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे होता, अशी मेळाव्याच्या ठिकाणी चर्चा सुरू होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. नुसता पराभव नाही तर ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. यानंतर शिवसेनेतील गटबाजीची चर्चा पुन्हा चव्हाट्यावर आली होती. खैरे यांनी स्वतः अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी लोकसभेत माझे काम केले नाही, असा जाहीर आरोप केला होता.

जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांमध्ये अजूनही मतभेद आहेत, हे आजच्या शिवसंकल्प मेळाव्यातही दिसून आले. राजकीय आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना खैरे यांनी आपल्या भाषणात राजू शिंदे यांना चिमटेही काढले. "मी राजूला कधीपासून शिवसेनेत येण्याचा आग्रह करत होतो. हरकत नाही तो आता आला त्याचे स्वागतच आहे. पण लोकसभा निवडणुकीआधी आला असता तर मी निवडून आलो नसतो का?" असा सवाल खैरेंनी उपस्थित केला.

"तू गद्दारांना 25 हजारांची लीड दिली. पण, हरकत नाही आता विधानसभा निवडणुकीत आपण एकत्रितपणे गद्दारांना गाडून टाकू. मात्र, पक्षात काम करताना गटबाजीत अडकू नको," असे आवाहनही खैरे यांनी राजू शिंदे व त्यांच्या समर्थकांना केले.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 1995 मध्ये जेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते, तेव्हा मराठवाड्यात आपले 17 आमदार निवडून आले होते. यावेळी वीस पेक्षा जास्त आमदार निवडून आले पाहिजे," असे आवाहन खैरे यांनी उपस्थितांना केले.

"एमआयएम पुन्हा डोकेवर काढू पाहत आहे, त्यांनी शहरात दंगली घडवायचे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यांना रोखायचे असेल तर शहरातील तीनही मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली पाहिजे," असेही खैरे म्हणाले.

आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात खैरे यांनी पक्षाती गटबाजीचा जाहीरपणे उल्लेख केल्याने पक्षात अजूनही सगळे अलबेल नाही, हे दाखवून दिले. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोन नेत्यांमध्ये जिल्ह्यातील शिवसेना विभागली गेलेली आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT