Atul Save, Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire : 'चंद्रकांत खैरेंकडून मंत्री सावेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा...' ; ये रिश्ता क्या कहलाता है!

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar News :

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात भाजप आणि ठाकरे गटामधील नेत्यांमध्ये विळ्याभोपळ्याचे वैर पाहायला मिळते. गेली 25-30 वर्षे एकत्र युतीमध्ये काम केलेले नेते एकमेकांवर असे काही तुटून पडतात की खरंच हे कधीकाळी एकत्र होते का? असा प्रश्न पडतो. संधी मिळेल तेव्हा हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसतात. अशातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा काल वाढदिवस उत्साहात साजरा झाला. आणि त्यांना शुभेच्छा देत शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सर्वांना सुखद धक्का दिला. चंद्रकांत खैरे यांचे संबंध जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी ताणले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या शुभेच्छांना विशेष महत्त्व आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अतुल सावे (Atul Save) यांना राज्यातील शिवसेना-भाजप आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी सरकारमध्ये कॅबिनेटपदी बढती मिळाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेवटच्या सहा महिन्यांत सावे यांना राज्यमंत्री करण्यात आले होते. आता तर त्यांचे राज्याच्या राजकारणातही महत्त्व वाढले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात अतुल सावे यांचे वडील (दिवगंत) मोरेश्वर सावे आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी अनेक वर्षे शिवसेनेत (अखंड) एकत्र काम केले होते. अगदी अतुल सावे भाजपमध्ये असतानाही मोरेश्वर सावे आणि खैरे यांनी आपल्या वैयक्तिक संबंधात कधी दुरावा निर्माण होऊ दिला नाही. आता मोरेश्वर सावे (Moreshwar Save) हयात नाहीत, शिवसेना-भाजपची पंचवीस वर्षांची युतीही तुटली. शिवसेना फोडण्याचा भाजपवर (BJP) आरोप केला जातो आणि त्याच भाजपचे सावे मंत्री आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे असताना खैरे यांनी सावेंना आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद (संभाजीनगर) लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तिकडे भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यासोबत अतुल सावे यांचेही नाव घेतले जात आहेत. परंतु सावे यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही.

वडील मोरेश्वर सावे यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात लोकसभा लढवणे जड जाईल, शिवाय कौटुंबिक संबंधामध्ये कटुता निर्माण होईल, यामुळे सावेंनी नकार दर्शवल्याचे बोलले जाते. जिल्ह्याच्या राजकारणात ही चर्चा सुरू असतानाच खैरेंनी सावेंना आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या चर्चेला हवा दिली.

जिल्ह्याच्या राजकारणात युती तुटली असली तरी भविष्यात एकमेका सहाय्य करूची भूमिका स्थानिक पातळीवर अनेक नेते घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सावे-खैरे यांच्यात उफाळून आलेले हे प्रेम बरेच बोलके म्हणावे लागेल.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT