Loksabha Election 2024 : बाकीचे सारे बाजूला व्हा रे... म्हणत 'हे' निवृत्त सनदी अधिकारी लागले कामाला

Osmanabad Loksabha constituency : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने भेटीगाठी वाढवल्याने या मतदासंघाचे 'हे' राजे असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Devendra Fadnavis and IAS image
Devendra Fadnavis and IAS imageSarkarnama

Dharashiv Political News :

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांमध्ये चुरस सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे) इच्छुकांनी उघडपणे इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार आधीच कामाला लागले आहेत. शिवसेनेचे धनंजय सावंत. प्रा. रवींद्र गायकवाड, भाजपचे बसवराज मंगरुळे हेही कामाला लागले आहेत. आता, बाकीचे सारे बाजूला व्हा रे, आला रे आला राजा... असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांने धाराशिव जिल्ह्यासह लोकसभा मतदारसंघात धडाक्यात एन्ट्री केली आहे.

Devendra Fadnavis and IAS image
Devendra Fadanvis News : फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय केलं; कार्यकर्त्याकडून मराठवाड्यात जाहिरातबाजी...

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा (Osmanabad Loksabha constituency) आवाका तीन जिल्ह्यांत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघासह निलंगा तालुक्यातील काही गावांचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश आहे.

त्यामुळे मतदारसंघातील सर्व गावांत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होते. प्रचंड मोठी प्रचारयंत्रणा हाताशी असावी लागते. यादृष्टीने इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व गावांमध्ये पोहोचायला वेळ मिळेल की नाही, म्हणून प्रा. बिराजदार, मंगरूळे यांनी आधीपासूनच दौरे सुरू केले आहेत. सावंत यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. प्रा. गायकवाड सध्या तरी शांत आहेत. त्यांनी दोनवेळा लोकसभेची निवडणूक (Lokabha Election) लढवली असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या चांगला परिचयाचा आहे.

हे सर्व घडत असताना बाकीचे सारे बाजूला व्हा रे म्हणत निवृत्त आयएएस अधिकारी, 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveensingh Pardeshi) आता मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत काही दिवसांपूर्वी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, मात्र आता त्यांनी भाजपचे (BJP) पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

त्यांची फेसबुक वॉल सध्या बोलकी आहे. विविध कार्यक्रमांना, प्रकल्पांच्या उद्घाटनांना ते भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या जोडीने उपस्थित राहू लागले आहेत. तसे व्हिडीओ त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकले आहेत. या व्हिडीओंमध्ये सर्वाधिक फोकस प्रवीणसिंह परदेशी यांच्यावरच दिसून येत आहे. किल्लारी-लातूर भागात प्रलयंकारी भूकंप झाला त्यावेळी परदेशी हे लातूरचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी त्यांनी मदतकार्यात केलेल्या समन्वयाचे कौतुक झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परदेशी हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महिला सबलीकरणासह विविध उपक्रमांचा आढावा घेत आहेत. बचतगटाच्या महिलांना मार्गदर्शन करत आहेत. विविध दुर्बल घटकांना लाभाचे वाटप करण्याच्या कार्यक्रमांनाही उपस्थिती लावत आहेत.

अशाच एका कार्यक्रमासाठी तीन दिवसांपूर्वी ते उमरगा शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. ते सामान्य लोकांशी आपुलकीने संवाद साधत आहे, तरुणांच्या पाठीवर हात ठेवून त्यांच्याशी बोलत आहेत. हे सर्व व्हिडीओ त्यांच्या फेसबुक वॉलवर अपलोड करण्यात आले आहेत.

धाराशिवजवळील कौडगाव येथील एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल पार्कची उभारणी केली जाणार आहे, असे सांगितले जाते. त्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी देशातील काही मोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी कौडगाव एमआयडीसीत येऊन पाहणी केली होती. त्यावेळी पाहणी करताना आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करताना तसेच रहिवाशांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ परदेशी यांच्या फेसबुक वॉलवर अपलोड करण्यात आला आहे. तो व्हिडीओ सुरू असताना, बाकीचे सारे बाजूला व्हा रे आला रे आला राजा... हे गाणे ऐकायला येते.

त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्याचा व्हिडीओही परदेशी यांच्या वॉलवर अपलोड झालेला आहे. यासह ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याची छायाचित्रेही पाहायला मिळतात.

Devendra Fadnavis and IAS image
PM Narendra Modi : लोकसभेसाठी भाजपचा 'टप्पा' उद्घाटनाचा घाट; आष्टी ते अंमळनेर रेल्वेमार्गाचं पंतप्रधान करणार उद्घाटन

भाजपमध्ये पक्षशिस्तीला महत्त्व आहे. एखादी गोष्ट मान्य नसली तरी पक्षश्रेष्ठींचा आदेश आला की ती मान्य करावी लागते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आणखी काही नावे समोर येऊ शकतात. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही, मात्र इच्छुकांनी वातावरणनिर्मिती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेही (Shivsena) या मतदारसंघावर मजबूत दावा ठोकला आहे. असे असतानाही मतदारसंघ भाजपला सुटला तर पक्षाने दिलेल्या उमेदवाराचाच अन्य इच्छुकांना प्रचार करावा लागणार आहे. दावे केले असले तरी महायुतीत ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल, त्याच्या विजयासाठी प्रयत्न करणार, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या इच्छुकांनी आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे कोण राजा येतो आणि बाजूला कोणाला व्हावे लागेल, याबाबत मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Devendra Fadnavis and IAS image
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांनी नांदेड काँग्रेसमुक्त करण्याचा उचलला विडा; दिल्लीहून येताच भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरू!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com