नांदेड : माजी मंत्री व भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष भास्कर पाटील खतगांवकर (Bhaskar Patil khatgaonkar) यांनी नुकताच पक्षाला रामराम करत पुन्हा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच खतगांवकर व त्यांच्या समर्थकांचा काँग्रेसमधील प्रवेश महाविकास आघाडीसाठी महत्वाचा ठरणार आहे. पण भाजपसाठी ही घरवापसी कठीण जाणार असल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.
नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, खतगांवकर यांनी भाजप सोडली. हे अलीकडच्या काळात होऊ नये, पण कधी कधी हे टाळता येण्यासारखे नसते. पंढरपूर निवडणुकीवेळीही भाजपमध्ये आलेले राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे हे निवडणुकीच्या आठ दिवस आधी पुन्हा राष्ट्रवादीत गेले. पण त्यानंतरही आम्ही ही निवडणूक जिंकली. भास्करराव पाटील खतगांवकर आमच्याबरोबर राहिले असते तर मी प्रचाराला येण्याचीही आवश्यकता राहिली नसती. इतकी ही निवडणूक सोपी होती. ते गेल्यामुळे थोडी कठीण झाली, अशी कबुली पाटील यांनी दिली.
ही निवडणूक कठीण झाली म्हणून जिंकणार नाही, असं नाही. आम्ही ही निवडणूक जिंकणारच, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. पंढरपूरलाही असाच असंतोष समाजात होता. सामान्य माणूस निवडणुकीची वाट बघत बसलेला असतो. पंढरपूरमध्ये मतांमधून राग व्यक्त केला. त्यापेक्षा जास्त घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. रोज किमान चार महिला अत्याचाराच्या घटना घडत आहे. दररोज मंत्र्यांविरोधात कारवाई सुरू आहे. प्राप्तीकर विभागाकडून कारवाईची माहिती दिली जात आहे. हे सगळं लगेच लोकांना कळत आहे. त्यामुळं कितीतरी पटीने आता असंतोष आहे. पंढरपूरमध्ये आम्ही 3700 मतांनी जिंकलो, या निवडणुकीत त्यापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकू, असं पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, खतगांवकर यांच्या घरवापसीने मंत्री अशोक चव्हाण भलतेच खूष झाले आहेत. खतगांवकर हे चव्हाण यांचे भावजी आहेत. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात खतगांवकर-चव्हाण यांच्यात वीळ्याभोपळ्याचे वैर असल्याचे अनेकदा दिसून आले. २०१४ मध्ये खतगांवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तो देखील अशोक चव्हाण यांच्याशी असलेल्या राजकीय वैरातूनच असे देखील बोलले जाते.
खतगांवकर, पोकर्णा व इतर पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाचे मी स्वागत करतो, तमुच्या पक्ष प्रवेशाने मराठवाड्यात संघटनेला बळकटी मिळेल, अशी सदिच्छा देखील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी खतगांवकर यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी पालकमंत्री चव्हाण यांनी भेट दिली. सात वर्षानंतर या दोन नेते आणि दाजी-मेव्हुण्यामध्ये मनोमीलन झाल्याने जिल्ह्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी दोघांमध्ये दिलखुलास चर्चा तर झालीच, पण देगलूर बिलोली मतदारसंघात पुन्हा विजय मिळवण्याचा निर्धारही करण्यात आला. भाजपमध्ये खासदार खतगावकर यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी होती. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खतगावकर यांची भेट घेऊन चर्चाही केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.