Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Bhujbal Vs Jarange : 'डोक्यावर जेवढे पांढरे केस, तेवढी आंदोलनं...; मनोज जरांगेंचा घेतला समाचार..

Chetan Zadpe

Hingoli News : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात ओबीसी नेत्यांची आज दुसरी ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेसाठी ओबीसी तसेच भटक्या विमुक्त समाजाचे नेतेही उपस्थित होते. यात विशेष बाब म्हणजे या सभेत मंत्री छगन भुजबळांसोबत, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ही भुजबळांशी मतभेद विसरून सभेसाठी उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा होत्या, पण ते अनुपस्थित होते. दरम्यान यावेळी भाषणात छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी वादावर भाष्य करतानाच, मनोज जरांगे पाटील यांच्यावरही सडकून टीका केली. (Latest Marathi News)

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "आता कोणीतरी नवीन नेता दाखल झाला आहे. नवा म्हणत आहे की, भुजबळ हे म्हातारे झालेत. अरे.. होय मी म्हातारा झालो आहे. पण कोण कायम तरूण राहतो? पण त्या नव्या नेत्याला सांगतो की, माझ्या डोक्यावर आता किती पांढरे केस आहेत ना, तेवढे आंदोलने या भुजबळांनी केली आहेत," अशा शब्दात त्यांनी जरांगे यांचं नाव न घेता टोला लगावला.

भुजबळ पुढे म्हणाले, "आम्ही कशा पद्धतीने जगायचं? कशाला सांगता? आम्ही कुठे एक दगड तरी मारला का? कोणत्या आंदोलनात एक टायर तरी जाळलो का? गेले काही दिवस आमचं कुटुंब नुसतं शिव्या ऐकत आहे. काय चाललंय राज्यात? पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. फोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते, अशा शब्दांत त्यांनी जरांगेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बीडमध्ये जाळपोळ घडली, घरे जाळली गेली. त्याचा कुणी धिक्कार केला का? मतभेद विसरून सगळ्यांनी त्या ठिकाणी जायला हवं होतं. तेथील लोकांना धीर द्यायला हवं होतं. या घटनांचा निषेध करायला पाहिजे होता. पण, तिथे कुणी गेलंच नाही. आणि त्यानंतर मी तिथे गेलो तर म्हणे आग लावयला चाललोय. म्हणजे कुणाच अश्रू पुसायचे नाही का?" अशा टोकदार शब्दांत भुजबळांनी प्रहार केला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT