APMC Election News
APMC Election News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar APMC News : वज्रमुठ सुटली, शिंदेंच्या शिलेदारांनी गड राखले..

Jagdish Pansare

Marathwada : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांवर (Chhatrapati Sambhajinagar APMC News) शिंदेगट-भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीसाठी हा अनपेक्षित धक्का होता. राज्यातील सत्तांतरात सर्वाधिक आमदारांनी बंडखोरी केलेल्या जिल्ह्यात बाजार समितीच्या मतदारांनी त्याचा परिणाम इथे जाणवू दिला नाही. बाजार समित्यांचे मतदान हे पक्ष चिन्हावर नसले तरी त्यांच्यावर पक्षाचा व त्या त्या नेत्यांचा पगडा हा असतोच.

पण ज्यांना तालुका, जिल्ह्याच्या राजकारणात रस नाही ते स्थानिक राजकारणात वाटेल ती तडजोड करतात आणि आपले हित साध्य करून घेतात. (Bjp) त्यामुळे जिल्ह्यात विचित्र युत्या आणि आघाड्या झाल्याचे पहायला मिळाले. अनेक ठिकाणी राज्याच्या सत्तेत असणारे बाजार समित्यांमध्ये विरोधात लढल्याचे दिसून आले. (Shivsena) पैठण बाजार समिती निवडणुकीत रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घेतलेली `एकला चलो रे` ची भूमिका त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

त्यांनी भाजपला कचपटासमान लेखत बाजूला ठेवले आणि एकट्याच्या जीवावर निवडणूक लढवली आणि जिंकली. विशेष म्हणजे (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीसह सगळ्या विरोधकांना त्यांनी चीतपट केले. १८ जागा जिंकत आपणच तालुक्याचे हुकमी एक्के असल्याचे त्यांनी दाखवून दिले. हीच किमया शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी देखील करुन दाखवली. भाजपचा निम्मा गट विरोधात असतांना बोरनारे यांनी सत्ता काबीज करत महाविकास आघाडीसह भाजपमधील विरोधकांनाही धडा शिकवला.

एवढेच नाही तर लासूर बाजार समितीत त्यांनी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना मदतीचा हात देत ५० वर्षांची सत्ता उलथवून टाकली. आपल्याच मतदारसंघातील गंगापूरची बाजार समितीही बंब यांनी जिंकली. इकडे फुलंब्रीत १५ वर्षांपासून असलेली काॅंग्रेसची सत्ता भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी घालवली. इथेही शिंदे गटात फूट पडलेली असतांना भाजपने बहुमत मिळवले. छत्रपती संभाजीनगर बाजार समिती देखील याचीच पुनरावृत्ती करण्यात बागडेंना यश आले.

सगळ्यात धक्कादायक निकाल होता तो कन्नड बाजार समितीचा. जिल्ह्यातील चार आमदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर ठाकरेंशी इमान राखून असलेल्या उदयसिंह राजपूत यांना बाजार समितीत मतदारांनी नाकारले. ना महाविकास आघाडी, भाजप, ना ठाकरे गट, इथे सत्ता मिळवली ती शिंदे गटाच्या नितीन पाटील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या पॅनलने. विद्यमान आमदार राजपूत आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव या दोघांसाठीही हा धक्का होता. अर्थात पाटील-जाधव यांच्या पॅनलच्या यशात पडद्यामागच्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार व केंद्रीय मंत्री दानवे या कलाकार आणि त्यांच्या रणनितीचा मोठा हात होता.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकारण तापलेले होते. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा, ठाकरेंच्या संवाद यात्रा, सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन सभा आणि त्यातून शिंदे गटाचे आमदार, मंत्र्यांवर झालेली टीका पाहता बाजार समितीत महाविकास आघाडी बाजी मारेल अशी चर्चा होती. परंतु मर्यादित मतदान आणि स्थानिक पातळीवर सोयीचे राजकारण यामुळे बाजार समित्यांमध्ये या सगळ्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ सुटली, पण शिंदेंच्या शिलेदारांनी गड राखले असेच म्हणावे लागेल. यात काही ठिकाणी भाजपला मात्र शिंदे गटाला सोबत घेतल्याचा फायदा झाल्याचेही दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT