Chhatrapati Sambhajinagar  Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Assembly Election 2024 : संभाजीनगर जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह ; दुपारपर्यंत 33.89 टक्के मतदान

Chhatrapati Sambhajinagar Voting Day : संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीविरुद्ध- महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असली तरी काही मतदारसंघांमध्ये एमआयएम, वंचित बहुजन आघाडी तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशी परिस्थिती आहे

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये सकाळच्या टप्प्यात काही भागात उत्साहाने मतदान झाले. तर काही ठिकाणी निरुत्साहाचे वातावरण होते. दुपारी मात्र मतदान केंद्रावर रांगा लागल्या आणि मतदानाची टक्केवारी झपाट्याने वाढल्याचे दिसून आले आहे. सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सर्वाधिक 43.85% मतदानाची नोंद झाली तर सर्वात कमी मतदान औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात 28.51% नोंदवले गेले.

संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीविरुद्ध- महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असली तरी काही मतदारसंघांमध्ये एमआयएम, वंचित बहुजन आघाडी तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशी परिस्थिती आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात 1 वाजेपर्यंत सर्वाधिक 43.85 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. या ठिकाणी सत्तार यांचा सामना महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांच्याशी होत आहे.

गेल्या पंधरा दिवसात सिल्लोड मधील वातावरण आरोप- प्रत्यारोप आणि कुरघोडीच्या राजकारणाने तापले होते. त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. शहरी व ग्रामीण भागामध्ये मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. मतदारांमधील उत्साह कोणाच्या बाजूने आहे ? हे 23 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघात 1 पर्यंत 28.99 इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विरुद्ध महायुतीचे प्रशांत बंब यांच्या काटे की टक्कर होत आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असताना सतीश चव्हाण यांनी गंगापूर- खुलताबाद मतदार संघात उडी घेत प्रशांत बंब यांना आव्हान दिले आहे. स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशा प्रचारामुळे रंगलेल्या या मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. मात्र सकाळच्या टप्प्यात मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. दुपारनंतर या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. संभाजीनगर शहरातील औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम या तीनही मतदार संघात मतदानाचे प्रमाण सकाळच्या तुलनेत दुपारी वाढल्याचे दिसून आले. औरंगाबाद पश्चिम मध्ये 28.51 % नोंदवले गेले. मध्य मतदारसंघात 29.85 तर औरंगाबाद पूर्व मध्ये सर्वाधिक 33.48 एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत महायुतीच्या संजना जाधव आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या तिरंगी लढत होत आहे.

या मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत 35.71 टक्के मतदानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांची लढत शिवसेना महाविकास आघाडीचे दत्ता गोर्डे यांच्याशी होत आहे. ऐन निवडणूक प्रचाराच्या दोन दिवस आधी विलास भुमरे हे घरात पडल्यामुळे त्यांच्या हाता पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे शेवटचे दोन दिवस ते प्रचार करू शकले नाही. या मतदारसंघात दुपारी एक पर्यंतच्या नोंदीनुसार 40.35 टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. राज्यातील लक्षणीय लढतीपैकी पैठण मतदार संघाची लढत असणार आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अनुराधा चव्हाण विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडीचे विलास औताडे यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. या मतदारसंघात 34.89 टक्के मतदान झाले असून हा आकडा सायंकाळपर्यंत 60 टक्क्याच्या वर जातो का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे विद्यमान आमदार असलेल्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दिनेश परदेशी विरुद्ध बोरणारे अशी रंगतदार लढत होत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत या मतदारसंघात 30.72 टक्के मतदानाची नोंद आहे. एकूणच संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान दुपारच्या सत्रात वाढल्याचे दिसून आले. मतदारांमधील हा उत्साह सायंकाळपर्यंत कायम राहिला तर यावेळी रेकाॅर्डब्रेक मतदानाची नोंद होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT