
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळेस राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होतांना पाहायला मिळणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. गावगाड्यावर आपलंच वर्चस्व राहावं म्हणून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी मतदान सुरू आहे. काही ठिकाणी मतदान शांततेत पार पडत आहे. तर काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागलं आहे. कुठे राडा झालाय. कुठे पैशाचं वाटप तर कुठे बाचा-बाचीचा प्रकार उघड झालाय, कुठे 'ईव्हीएम'मध्ये बिघाड तर कुठे आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झालीये. पण इतर भागात नागरिकांनी मतदानात हक्क बजावला आहे.
आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून राज्यात काही ठिकाणी काही ठिकाणी 'ईव्हीएम'मध्ये बिघाड झाला होता. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती बस स्थानकातील विक्रम हायस्कूल येथील 'ईव्हीएम' तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 'ईव्हीएम'मध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मतदानाच्या सुरूवातीलाच मतदारांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळले.
परळी विधानसभा मतदारसंघात धर्मापुरी बूथवर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. सीसीटीव्ही बंद करून बोगस मतदान करण्यात येत असल्याच्या गंभीर आरोप केल्यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे.
सांगलीत महापालिकेचे माजी उपमहापौर विजय घाडगे यांच्यावर अहिल्यानगर, कुपवाड येथे गुंडांचा हल्ला केला. हातावर आणि बोटावर वार केले आहेत. किरकोळ वादातून हा हल्ला झाला त्यामुळे घाडगे यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तसेच राज्यातील सर्वाधिक चर्चेतील बारामतीत विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, येथील महात्मा गांधी बालक मंदिर बूथमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथे गोंधळ उडाला आहे. यात मतदान केल्यानंतर मशीनवरील बटन दाबले असता ते दुसऱ्याच उमेदवाराला मतदान जात असल्याचा प्रकार होत आहे. यामुळे या केंद्रावरील मतदान प्रक्रिया काही वेळ थांबविण्यात आली आहे. यामुळे इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथे गोंधळ उडाला आहे.
नांदगाव या संवेदनशील मतदारसंघात आज मतदारांची ओळख पटविण्यावरून मोठा राडा झाला. हे मतदार परराज्यातून आणल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांना डांबून ठेवल्याने हाय व्होल्टेज ड्रामा घडला. यावेळी आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार भुजबळ समोरा समोर आल्याने हमरी तुमरी झाली. पोलिसांच्या उपस्थितीतच हे घडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.