Sandipan Bhumare, vilas Bhumare Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : बाप से बेटा सवाई! भुमरेमामांचा किल्ला मुलाने नेटाने लढवला..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीनगरात 13 मे रोजी मतदान पार पडले. एकीकडे पाच वेळा लोकसभा लढवलेले महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तर त्यांच्यासमोर सहावेळा विधानसभा लढवलेले, पण लोकसभा लढवण्याचा पहिलाच अनुभव असलेले महायुतीचे संदीपान भुमरे. पण पहिल्यादांच लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या भुमरे यांनी मायक्रो प्लानिंग करत महाविकास आघाडीला जेरीस आणल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात होत आहे.

पण यात महत्वाची भूमिका बजावली ती भुमरेमामांचा मुलगा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विलास उर्फ बापू भुमरे यांनी. लोकसभेची उमेदवारी मिळवण्यापासून तर मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत विलास भुमरे यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणा अत्यंत बारकाईने राबवल्याचे समजते. भुमरे यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून विरोधकांकडून टीका केली जात होती,

पण पैठण विधानसभा मतदारसंघातील वीस हजाराहून अधिक नातेवाईक, विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जोरावर विलास भुमरे यांनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुसंडी मारली. महायुतीतील एकही घटक पक्ष, त्यांचे नेते, पदाधिकारी तसेच बुथवरचा कार्यकर्ता नाराज होणार नाही याची व्यवस्थित काळजी बापू यांनी घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे यांच्या तुलनेत शहर आणि ग्रामीण भागात शिंदेसेनेची संघटनात्मक ताकद कमी आहे, याची जाणीव भुमरे पिता-पुत्रांना होती.

त्यामुळेच भाजपच्या (BJP) संघटनात्मक जाळ्याचा पुरेपूर आणि योग्य वापर, तोही त्यांच्या सोयीनुसार करत भुमरे यांनी लोकसभेचा किल्ला नेटाने लढवल्याचे दिसून येते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Constituency) सत्ताधारी व मित्र पक्षाच्या आमदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांना लागेल ती मदत पोहोचवण्याचे काम विलास भुमरे (Vilas Bhumare) यांच्या माध्यमातून झाले. परिणामी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात भुमरेंसाठी यंत्रणा शत प्रतिशत कामाला लागल्याचे सांगितले जाते.

संदीपान भुमरे या मायक्रो प्लॅनिंगच्या जोरावर संभाजीनगरचा गड जिंकतात का? हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. भुमरे निवडून आले, तर पैठण विधानसभा मतदारसंघात त्यांचा राजकीय वारसा विलास भुमरे चालवतील हे स्पष्ट आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा निम्मा कारभार पडद्यामागून बापु भुमरे हाकतात, अशी टीका त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने केली जाते. लोकसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारीच विलास भुमरे यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे भुमरे विजयी झाले तर त्यांच्या या यशात बाप से बेटा सवाई या प्रमाणे बापू म्हणजेच विलास भुमरे यांचा सिंहाचा वाटा असेल, असं त्यांचे समर्थक सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT