harshvardhn jadhav, imtiyaj jalil, sandipan bhumre, shantigiri maharaj  sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Constituency : संभाजीनगरात जय बाबाजी कोणाचं भलं करणार ?

Political News : नाशिक, जळगाव, संभाजीनगर या जिल्ह्यात बाबाजींना मानणारा मोठा वर्ग आहे. यावेळी दिल्ली गाठण्यासाठी शांतिगिरी महाराजांनी नाशिक मतदारसंघाची निवड केल्याने संभाजीनगरातील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांचा जीव भांड्यात पडला होता.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी असा नारा देत बाबाजी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

नाशिक, जळगाव, संभाजीनगर या जिल्ह्यात बाबाजींना मानणारा मोठा वर्ग आहे. यावेळी दिल्ली गाठण्यासाठी शांतिगिरी महाराजांनी नाशिक मतदारसंघाची निवड केल्याने संभाजीनगरातील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांचा जीव भांड्यात पडला होता. (Chhatrapati Sambhajinagar Constituency News)

मतदान होण्यापुर्वी महायुतीचे संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), एमआयएमचे इम्तियाज जलील (Imtiyaj Jalili), अपक्ष हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav), जीवन राजपूत या उमेदवारांनी वेरूळ आश्रम गाठत शांतिगिरी महाराजांकडे आशीर्वाद मागितला होता. बाबाजींचा आशिर्वाद ज्याच्या माथी त्याला लाखभर मतांची मदत, असे मानले जाते.

2009 मध्ये शांतिगीरी महाराजांनी संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. अपक्ष लढलेल्या महाराजांनी तेव्हा 1 लाख 48 हजार मते घेतली होती. तरी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे त्यावेळी निवडून आले होते. तसं पाहिलं तर चंद्रकांत खैरे शांतिगीरी महाराजांचे भक्त, पण त्यांच्याविरुद्ध अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

2019 मध्ये शांतिगीरी महाराजांनी संभाजीनगरातून लढण्याची तयारी सुरू केली होती. पण शिवसेना-भाजप युती असल्यामुळे हिंदू मतांचे विभाजन टाळावे, अशी विनंती त्यांना दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. या विनंती मान देत बाबाजींनी निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2024 मध्ये सगळे उमेदवार बाबाजींच्या आशिर्वादासाठी वेरुळच्या आश्रमात धावले, पण खैरे यांनी मात्र तिकडे जाणे टाळले. नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. तर संभाजीनगरात 13 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

नाशिकमध्ये सायकलवर फिरून प्रचार करत शांतिगीरी महाराजांनी धुरळा उडवला आहे. पण संभाजीनगरमध्ये त्यांच्या आशिर्वादाचा हात कोणाच्या डोक्यावर होता? हे चार जूनच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

(Ediyed by : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT