Chhatrapati Sambhajinagar News: शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी, नेत्यांमधील कुरबुरीमुळे जिल्ह्यात पक्षाला फटका बसला. महापालिका, जिल्हा परिषदेतील सत्तेला मुकावे लागले. नेते गटबाजीत अडकल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली. मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेत जावे लागले. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला.
'एसआयआर' सह आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा आणि आवश्यक त्या सूचना पदाधिकारी, शिवसैनिकांना देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामंत यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर निशाणा साधला.
आपल्या मतभेदामुळे कुटुंब दुभंगणार नाही याची काळजी व्यासपीठावरील सर्वांनी घ्यावी, अशी सूचना त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या शिरसाट, भुमरे, जंजाळ यांच्याकडे कटाक्ष टाकत दिल्या. स्वत:चा गट तयार करण्यापेक्षा शिवसेना एक गट म्हणून वागायला पाहिजे. आम्ही संभाजीनगरमध्ये येत नसलो तरी आमच्या कानावर अनेक गोष्टी येत असतात. कशामुळे आपण जिल्हा परिषद, महापालिकेत कमी पडलो? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. शिवसेनेला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर जीव तोडून काम केल्याशिवाय ते शक्य होणार नाही.
संभाजीनगरमधील बंद खोलीतील चर्चा जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत काही होत नाही. बंद खोलीतील चर्चा आता बंद करून टाकू. आम्ही जे ऐकले त्यावरून संभाजीनगरचे पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. तो संभ्रम दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सामंत यांनी यावेळी केले.
संघटनात्मक बांधणीच्या कामाबद्दलही सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. इथे पक्षाच्या बांधणीचे काम झालेले नाही, याबद्दल आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. माझ्या मतदारसंघात 100 टक्के काम झालेले आहे. सर्व लोकप्रतिनिधी माझ्या मतदार संघात निवडून आलेले आहेत. म्हणून मला सांगण्याचा अधिकार आहे, असे सामंत म्हणाले.
एकनाथ शिंदे कधी 16 तर कधी 20 तास काम करतात. तुम्ही त्यांच्या दहा टक्के तरी करा. मी माझ्या मतदारसंघात मुस्लिम मोहल्यात विश्वास निर्माण केला त्यामुळे 5 मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत, याकडे सामंत यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. राज्यात दीड लाख बीएलए करायचे आहेत. त्यांचा मुंबईत मेळावा एकनाथ शिंदे घेणार आहेत आणि त्यांना सन्मानपूर्वक बक्षीस देणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.