

Mumbai News: महायुती सरकारची खरीप पूर्व हंगामाची पूर्वतयारी बैठक गुरुवारी (ता.21 मे) पार पडली. या बैठकीसंबंधीची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी खरीप पूर्व हंगामाची माहिती देतानाच कर्जमाफीविषयीची मोठी घोषणा केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने पुन्हा सत्तेत परतल्यानंतर कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर महायुती सरकार दुसर्यांदा सत्तेत परतलं. पण त्यावेळी जाहीर केलेली कर्जमाफी कधी होणार याविषयी विरोधकांसह शेतकर्यांकडून वारंवार विचारणा सरकारकडे केली जात होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच थेट कर्जमाफीची तारीख सांगितली सांगितली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.21) येत्या 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.तसेच यावेळी फडणवीसांनी पुढच्या हंगामासाठी संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा असणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
फडणवीस म्हणाले, कर्जामाफीच्या बाबतीत आम्ही बँकांशी चर्चा केली आहे. आम्ही कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे, तो वेळेत कसा पूर्ण करता येईल त्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. यात बँकांसोबत कर्जमाफी कर्जमाफी कोणत्या फॉरमॅटमध्ये करायची,याविषयीची एक चर्चा पूर्ण झाल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
तसेच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्जवाटप करताना शेतकऱ्यांकडून सीबिल स्कोअरची मागणी न करण्याच्या सूचना निर्देश दिले आहेत. यावेळी त्यांनी कर्जवाटपासंदर्भासह कर्जमाफीविषयीही सर्व बँकांसोबत चर्चा केल्याची माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या खतांच्या पुरवठ्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. त्यांनी खतांच्या पुरवठ्यावरही सरकारचं कडक लक्ष असल्याचं सांगतानाच जागतिक परिस्थितीमुळे खतांच्या उत्पादनावर अधिक ताण येण्याची शक्यताही वर्तवली आहे.खतांसाठी अडवणूक, अवाजवी दर, तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी कोठे खतं वळवली तर जात नाही,याकडेही सरकार लक्ष ठेवून असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविस्तार अॅप सुरू करण्यात आले असून त्यावर पीक पद्धती आणि इतर माहिती एआयच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली असल्याचंही सांगितलं. तसेच शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या खतांच्या पुरवठ्यावर सरकारचं कडक लक्ष असल्याचंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खरीप हंगामावर यंदा एल निनोचं सर्वात मोठं संकट असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, हवामान विभागाने यंदा पावसाचा अंदाज 88 टक्के वर्तवण्यात आला आहे. तसेच हा पाऊस उतरत्या क्रमानं पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाची सरासरी वेगवेगळी राहणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं.
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात एल निनोची तीव्रता अधिक राहणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार खरीप हंगामाचं नियोजन कसं करता येईल, याबाबत चर्चा झाली असून त्यामुळे शेतीच्या पिकांवर मोठा ताण येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.