Dr. Bhagwat Karad  sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : डॉ. भागवत कराड ठरले भाग्यवान, थेट राज्यसभेवर संधी अन् केंद्रात मंत्रिपद...

Aurangabad Political News : विधानसभेने हुलकावणी दिलेल्या कराडांनी थेट दिल्ली गाठली.

Jagdish Pansare

Loksabha Election 2024 : राजकरणातील शह-काटशह कधी कोणाच्या पथ्यावर पडेल याचा काही नेम नसतो. भाजपमध्ये शहर कार्यकारिणीपासून ते प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, नगरसेवक, उपमहापौर, महापौर अन् एकदा विधानसभा लढवलेल्या पेशाने डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांना यशाने हुलकावणी दिली. 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, पण विजयाचा गुलाल काही कराडांच्या भाळी लागला नाही. त्यानंतर बरीच वर्षे पक्षात काम करत असलेल्या कराड यांना अचनाक लॉटरी लागावी, असा काहीसा प्रकार घडला.

महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला पर्याय शोधण्याचे काम सुरू झाले. उच्चशिक्षित आणि नव्या चेहऱ्याच्या शोधात असलेल्या भाजपची नजर बालरोगतज्ज्ञ आणि सर्जन असलेल्या कराड यांच्यावर गेली.काही दिवसांत महाराष्ट्रातून राज्यसभेवर कराड यांना पाठवण्याचा निर्णय दिल्लीतील धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या मोदी-शहा जोडीने घेतला. विधानसभेने हुलकावणी दिलेल्या कराडांनी थेट दिल्ली गाठली. कराडांचे नशिब फळफळले, पण हा प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. अवघ्या काही महिन्यांतच कराड यांच्यावर मोदी-शहा यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली. केंद्राच्या अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून कराड यांची निवड झाली. कराड यांच्याबाबतीत हा प्रकार म्हणजे छप्पर फाडके, असाच होता.

एका वार्डातून नगरेसवक निवडून आणण्याची क्षमता नाही, असा आरोप कराड यांच्यावर विरोधक करायचे. पण त्याच कराडांनी आता देशाच्या अर्थमंत्र्यांसोबत बसून देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठीचे शिवधनुष्य पेलत विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. उच्चशिक्षित कराड यांनी अल्पावधीतच मोदी-शाह यांचा विश्वास संपादन केला. याच विश्वासाच्या जोरावर राज्यसभेवर असलेले कराड आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेतून निवडून जाण्याचा निर्धार करत आहे. महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी भाजप आणि कराड यांची तयारी पाहता तेच उमेदवार असतील, असे बोलले जाते. कराड यांना उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले तर त्यांचा लोकसभेचा हा प्रवास व्हाया राज्यसभा असा ठरणार आहे.

भाजपमध्ये कराड यांना राज्यसभेवर निवड आणि अर्थ राज्यमंत्रिपद मिळण्याआधी फारसे कोणी गांभीर्याने घेत नसे. पण आज त्याच कराड यांच्याकडे जिल्ह्याच्या भाजपची सर्व सूत्रे आली आहेत. कराड आज जिल्ह्यातील एक मोठे नेते म्हणून उदयास आले आहेत. कराड लोकसभेच्या आखाड्यात उतरले तर छत्रपती संभाजीनगरची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.

नाव ( Name)

डॉ. भागवत किशनराव कराड

जन्म तारीख (Birth Date)

16 जुलै 1956

शिक्षण ( Education)

छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस व एमएस (जनरल सर्जरी) पदवी. मुंबई विद्यापीठातून एम. सीएच. (पेडियाट्रिक पदवी)

कौटुंबिक पार्श्वभूमी ( Family Background)

डॉ. भागवत कराड यांचा जन्म चिखली (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशीनाथराव, आई गयाबाई शेती करायचे. कराड यांचा विवाह 21 डिसेंबर 1981 मध्ये अंजली कराड यांच्याशी झाला. त्याही डॉक्टर आहेत. कराड यांना एक भाऊ (कै.अंगत कराड), दोन बहिणी दीपा गीते (नगरसेविका, लातूर), डॉ. उज्वला दहिफळे (प्लास्टिक सर्जन, भाजप शहर उपाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर) त्यांना तीन मुले आहेत. अश्विन कुमार हे इंजिनीअर असून ते आॅस्ट्रेलियात असतात. हर्षवर्धन कराड हे भाजपचे शहर सरचिटणीस असून ते नवकेतन फार्मास्युटिकल कंपनीचे काम सांभाळतात. वरुण कराड हे दिल्लीमध्ये व्यावसायिक आहेत. बायोगॅस प्रकल्पावर काम करतात. कराड यांना तीन सुना आणि नातवंडे आहेत.

नोकरी/व्यवसाय (Service/Business)

भागवत कराड हे पेशाने डॉक्टर असल्यामुळे राजकारणात येण्यापूर्वी ते पुर्णवेळ आपला व्यवसाय सांभाळायचे. पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर 1984 मध्ये कराड यांनी पत्नी अंजली यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. वाय. एस. खेडकर हॉस्पिटलमधून रुग्णसेवेला सुरुवात केली. सहा वर्षांनी 1990 मध्ये समतानगर क्रांतीचौक भागात डॉ. कराड मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटर हे स्वतःचे रुग्णालय सुरू केले. तेव्हा कराड हे मराठवाड्यातील पहिले पेडियाट्रिक सर्जन होते. याशिवाय नवकेतन फार्मास्युटिकल ही कंपनीही ते चालवतात.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (lok sabha constituency)

छत्रपती संभाजीनगर (आधीचा औरंगाबाद)

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असतानाच डॉ. कराड यांचा भाजपशी संपर्क आला. पक्षात काम करत असताना त्यांनी शहर चिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष, मनपा गटनेता, भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश चिटणीस अशा संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या. कराड यांनी 1995 मध्ये सर्वप्रथम अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूक कोटला कॉलनी वार्डातून लढवली आणि जिंकली. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची नजर कराड यांच्यावर पडली आणि त्यांनी कराड यांना भाजपमध्ये आणले आणि 1998 मध्ये थेट महापौर केले. 1995 ते 2009 दरम्यान कराड तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 1999 आणि 2006 अशी दोनवेळा कराड यांना भाजपने महापौरपदाची संधी दिली. पुढे गोपीनाथ मुंडे यांनीच कराड यांना 2009 मध्ये तेव्हाच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली पण त्यांचा पराभव झाला.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

डॉ. भागवत कराड हे गरीब शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना बरेच कष्ट सहन करावे लागले. याची जाणीव ठेवत कराड यांनी जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेऊन पदवी मिळवली तेव्हाच गोरगरीब रुग्णांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला होता. कराड यांनी जेव्हा स्वतःचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले तेव्हा पत्नीसोबत ते ग्रामीण भागात जाऊन शिबीरं घेऊन ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णावर उपचार करायचे. करमाड, लाडसांवगी, फुलंब्री भागात त्यांनी अनेक शिबीरं घेऊन लहान मुले व इतर रुग्णांवर उपचार केले. या शिवाय लायन्स क्लबच्या माध्यमातून भरवल्या जाणाऱ्या विविध शिबीरांमध्ये दिवंगत शरदकुमार दिक्षीत यांच्यासोबत कराड यांनी सेवा दिली आहे. सलग तीन वर्षापासून शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणांचे वाटप कराड यांच्याकडून केले जाते.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

भागवत कराड यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. 2021 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून पाठवायच्या जागेवर कराड यांची निवड करण्यात आली होती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

भागवत कराड हे 28 वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. शहरचिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, नगरसेवक, दोनवेळा महापौर राहिल्यामुळे त्यांच्या शहरी भागात चांगला जनसंपर्क आहे. शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना 33 हजार मते मिळाली होती. काँग्रेस उमेदवाराने त्यांचा 15 हजार मतांनी पराभव केला होता. 2021 मध्ये कराड यांची थेट राज्यसभेवर वर्णी लागली. त्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आली. खासदार आणि मंत्री झाल्यापासून मात्र त्यांचा जनसंपर्क शहरापुरता मर्यादित न राहता जिल्हाभरात वाढला आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना, बॅंकिग क्षेत्राच्या बैठका, परिषदा या माध्यमातून कराड यांचा कॉर्पोरेट क्षेत्रातही वावर वाढला आहे. पक्ष व संघटनात्मक कार्यक्रमातील त्यांचा वाढता सहभाग यामुळे कराडांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारले गेले आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

भागवत कराड हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. मंत्री म्हणून त्यांचे फेसबुक, एक्स, इन्स्टाग्रामचे अकाऊंट आहे. यावर आपल्या अर्थ मंत्रालय खात्याशी संबंधित माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, कार्यक्रमांची माहिती, व्हिडिओ, महापुरुषांच्या जयंती, दिनविशेष या संदर्भात आवर्जून पोस्ट केल्या जातात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मंत्री म्हणून देशात आणि देशाबाहेर झालेल्या कार्यक्रमांची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ कराड यांच्या सोशल मीडिया हँडलवर अपडेट केले जातात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

कराड यांच्या संदर्भात आतापर्यंत कुठलाही मोठा राजकीय वाद निर्माण झालेला नाही. कै. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून जेव्हा केंद्रीय नेतृत्वाने भागवत कराड यांना पुढे आणले. त्यांना राज्यसभेवर संधी देत मंत्री पद दिले, तेव्हा मुंडे समर्थकांनी कराड यांच्यावर टीका केली होती. परंतु मंत्रीपद मिळाल्यानंतर कराड यांनी थेट गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. शिवाय परळीत पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

गोपीनाथ मुंडे .

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

कराड हे उच्चशिक्षित असल्याने केंद्रात मोदी सरकारने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून कराड यांनी आपली छाप पाडत छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवर आपला दावा पक्का केला आहे. कराड राज्यसभेवर खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री झाल्यामुळे त्यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन वाढले आहे. राजकीय वादापासून कायम दूर राहिल्यामुळे कराड यांना पक्षांतर्गत विरोध फारसा नाही ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरते. निवडणूक लढण्यासाठीच्या निकषात आर्थिक बाजू महत्वाची ठरते. या कसोटीवरही कराड उजवे ठरतात. कराड यांच्या पाठीशी भाजपचे संघटन मजबुतीने उभे राहण्यामागे हेही एक महत्वाचे कारण समजले जाते.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी लागणारा जनसंपर्क आणि जिल्ह्यातील तळागाळातील छोट्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्काचा अभाव. जनतेतून निवडून येण्यासाठी राबवाव्या लागणाऱ्या यंत्रणेचा अभ्यास कराड यांना फारसा नाही. 2009 मध्ये पूर्व मतदारसंघातून विधानसभा लढवली असली तरी भाजपच्या नावावर कराड यांना 33 हजार मते मिळाली होती. वैयक्तिक जनसंपर्कावर मते मिळवण्यात कराड कमी पडतात. विरोधक कराड यांना लोकसभेचे उमेदवार मानायला तयार नाहीत. कराड यांनी आधी आपल्या मुलाला नगरसेवक म्हणून निवडून आणावे, असे म्हणत त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करतात. कराड सर्वसामान्यांमध्ये फारसे मिसळत नाहीत. त्यांच्या भोवती भाजपच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांचा घोळका असतो.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आतापर्यंत शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला येत होती. एकत्रित निवडणूक लढल्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेने सलग चारवेळा विजय मिळवला होता. 2019 मध्येही शिवसेना-भाजप युती होती पण त्यांचा उमेदवार पडला. याचे खापर भाजपवरही फोडले गेले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लढण्याची पहिली संधी भाजपला चालून आली आहे. शिवसेना शिंदे गट भाजपसोबत सत्तेत असल्यामुळे तेही या जागेवर दावा सांगण्याची शक्यता आहे. पंरतु पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट एकट्याच्या ताकदीवर ही जागा निवडून आणू शकत नाही याची जाणीव भाजप आणि शिंदे गटालाही आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात स्वतंत्र तयारी सुरू केली आहे.

भागवत कराड यांना वर्षभरापूर्वीच तयारीला लागा, असे सांगण्यात आल्याचे बोलले जाते. भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. शिवाय शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत असल्याने भाजप या मतदारसंघात विजय मिळवू शकतो, अशी परिस्थिती आहे. कराड यांची उमेदवारी दिल्लीतून जाहीर झाली, तर राज्यातील भाजपच्या सर्वच नेत्यांना त्यांना निवडून आणण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. कराड यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिला किंवा शिंदे गटाने ही जागा लढण्याचा हट्ट धरला तर मात्र महायुतीचे नुकसान होऊ शकते. भाजपने ही जागा लढवली नाही, तर ठाकरे गटासाठी ही निवडणूक सोपी होईल.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT