Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency: राजकारण्यांच्या बातम्या छापणारे पत्रकार इम्तियाज जलील झाले खासदार...

Aurangabad Political News : राजकारणात येण्यापूर्वी इम्तियाज जलील हे पत्रकार म्हणून कार्यरत होते. प्रिन्ट आणि डिजिटल मीडियामध्ये त्यांनी काम केले.
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleelsarkarnama

Loksabha Election 2024 : पुण्यात उच्चशिक्षण सुरू असतानाच हाती माईक घेतला अन् पत्रकारिता सुरू केली. राजकारण्यांच्या मागे पळणे, त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी तासनतास ताटकळत उभे राहणे, हे सगळे केले. पण मनात आले, कितने दिन दुसरों की खबरे बनाओगे, एक दिन खुदही खबर बन जाओ, आणि राजकारणात आलो, असा किस्सा छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सांगितला. एमआयएमकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ॲाफर पुण्यात पत्रकारिता करत असताना त्यांना आली.

भाषणातून, पढे लिखे नौजवान राजनिती मे आने चाहिये, असे आवाहन करणाऱ्या इम्तियाज जलील यांना कदाचित तेव्हा वाटलेही नसेल की तो नौजवान तेच ठरतील. बावीस दिवसांत उमेदवारीचा निर्णय झाला आणि इम्तियाज जलील यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा पराभव करत त्यांनी थेट विधानसभाच गाठली. एमआयएमचा झेंडा शहरात फडकला. संवेदनशील शहराच्या रस्त्यांवर हिरव्या गुलालाचे सडे पडले.

नाव ( Name)

सय्यद इम्तियाज जलील

जन्म तारीख (Birth Date)

10 ऑगस्ट 1968

शिक्षण ( Education)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (1996) आणि मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (2000) प्राप्त केले.

Imtiaz Jaleel
Ambadas Danve News : लोकसभेची उमेदवारी दानवेंना की खैरेंना, दानवे म्हणतात...

कौटुंबिक पार्श्वभूमी ( Family Background)

इम्तियाज जलील यांचा जन्म एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील सय्यद अब्दुल जलील हे सिव्हिल सर्जन होते, तर आई झाकिया जलील गृहिणी होत्या. इम्तियाज यांचे बंधू जेट एअरवेजमध्ये व्यवस्थापक होते. इम्तियाज यांचा विवाह रुमी फातिमा यांच्याशी 8 जुलै 1993 रोजी झाला. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा बिलाल आणि धाकटा हमजा हे उच्च शिक्षण घेत आहेत. बिलाल हा इम्तियाज यांना राजकारणातही मदत करतो. त्यांच्या पत्नी रुमी फातिमा या गृहिणी असून, त्या दुवा फॉऊंडेशनचेही काम पाहतात.

नोकरी/व्यवसाय (Service/Business)

राजकारणात येण्यापुर्वी इम्तियाज जलील हे पत्रकार म्हणून कार्यरत होते. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये त्यांनी काम केले. लोकमत, एनडीटीव्हीमध्ये ते पत्रकार होते. आमदार आणि त्यानंतर खासदार झाल्यानंतर ते पूर्णवेळ राजकारणात सक्रिय आहेत. या शिवाय शहरातील सिडको या उच्चभ्रू भागात इम्तियाज यांनी मुलगा बिलाल याला एक रेस्तराँ सुरू करून दिले आहे.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (lok sabha constituency)

छत्रपती संभाजीनगर (आधीचा औरंगाबाद)

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

इम्तियाज जलील हे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांचा तसा राजकारणाशी जवळचा संबंध होता. पण राजकारणात यायचे असे त्यांनी कधी ठरवले नव्हते. छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील म्हणून ओळखले जाते. येथील राजकारण कायम हिंदू-मुस्लिम धर्मावर आधारित राहिले आहे. एमआयएम पक्षाने जेव्हा शहरातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा उमेदवाराचा शोध इम्तियाज जलील यांच्यापाशी येऊन थांबला. उच्चशिक्षित आणि पत्रकारितेमुळे राजकारणाची जाण असलेल्या इम्तियाज यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ऐनवेळी झाला.

Imtiaz Jaleel
Nanded Politics : नांदेड जिल्ह्यात भाजपात जोरदार इन्कमिंग; काँग्रेसच्या मुन्नासिंह तेहरांच्या हाती 'कमळ'

त्यामुळे प्रचाराला जेमतेम 22 दिवस मिळाले. 2014 ची विधानसभा निवडणूक इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद मध्य मतदारंघातून लढवली. पूर्वी हा मतदारसंघ शिवसेना आणि त्यानंतर अपक्ष प्रदीप जैस्वाल यांनी जिंकला होता. 2014 मध्ये शिवसेना भाजप युती तुटली आणि मतांच्या विभाजनाचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला. 20 हजारांच्या मताधिक्याने इम्तियाज जलील पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले. विशेष म्हणजे इम्तियाज यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला. सध्या ते राज्य वक्फ बोर्डावरही कार्यरत आहेत.

शहरात पुन्हा जातीय तणाव, दंगली भडकणार असे चित्र उभे केले गेले. पण लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या इम्तियाज यांनी हा समज खोडून काढला. विरोधक प्रचार करत राहिले, पण इम्तियाज यांनी एमआयएमची ताकद वाढवत तरुणांची मोठी फौज उभारत महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावली. राजकारणात सुरुवातीलाच एवढे यश कदाचित कुणाच्या पदरी पडले असेल.

इम्तियाज जलील या बाबतीत भाग्यवान ठरले. त्यांचा प्रवास एढ्यावरच थांबणार नव्हता. आमदारकीची टर्म पूर्ण होत नाही तोच त्यांना लोकसभेची उमेदवारी पक्षाकडून जाहीर झाली. ग्रामीण भागात पक्षाची ताकद नाही म्हणून लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण इम्तियाज यांनी आपण येथून लढलेच पाहिजे, अशी गळ पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांना घातली. इम्तियाज यांचे सितारे बुलंदीवर होते.

Imtiaz Jaleel
Hingoli Loksabha Constituency : हिंगोली मतदारसंघात शिवसैनिकच एकमेकांना भिडणार...

शिवसेनेचा बालेकिल्ला भेदणे केवळ अशक्यच, असे वाटत असताना इम्तियाज यांनी या गडाला हादरे देणारा ऐतिहासिक विजय मिळवला. अशक्यप्राय वाटणारा विजय मिळाल्यानंतर इम्तियाज यांचा ॲक्सिडेंटल एमपी, असा उल्लेख केला गेला. पण साडेचार वर्षांतील आपल्या कामगिरीने इम्तियाज यांनी विरोधकांना तोंडघशी पाडले. आता 2024 मध्ये दुसऱ्यांदा लोकसभा विजयाला गवसणी घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

इम्तियाज जलील यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकारण आणि समाजकारण सुरू केले. आमदार असल्यापासून इम्तियाज जलील यांनी नशामुक्तीसाठी काम सुरू केले होते. घरात घरकाम करण्यासाठी येणाऱ्या महिलेच्या मुलींनी वडील दारू पिऊन घरी मारहाण करतात, भांडण करतात असे सांगितले. या एका उदाहरणानंतर इम्तियाज यांनी शाळा, रुग्णालये किंवा नागरी वस्तीत असलेल्या देशी दारू दुकांनाच्या विरोधात आंदोलन छेडले होते. मोर्चे काढून काही दुकानेही फोडण्यात आली होती. त्यानंतर काही दारूची दुकाने स्थलांतरित करण्यात आली होती.

या शिवाय दुआ फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केवळ मुस्लिम समाजातीलच नाही तर इतर समाजातील महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीनचे वाटप, गरजूंना शिष्यवृत्ती, शालेय साहित्य, कपडे, अन्न-धान्य आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले. बेरोजगार तरुणांसाठी इम्तियाज यांच्याकडून नियमित रोजगार मेळावेही भरवले जातात. आतापर्यंत हजारो तरुणांच्या हाताला या माध्यमातून काम मिळाले आहे. नशामुक्तीसाठी इम्तियाज यांनी पुढाकार घेतला असून दुआ फाऊंडेशनच्या वतीने जनजागृतीचे कामही केले जात आहे. कोरोना काळात किचन चालवत इम्तियाज यांनी पक्ष आणि आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक गोरगरीब आणि गरजू लोकांपर्यत जेवण पोहोचवले होते. या शिवाय धान्याचे कीट, औषधींचा पुरवठाही करण्यात आला होता.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

इम्तियाज जलील यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढवली होती. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज असा थेट सामना झाला. या शिवाय काँग्रेस, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हेही रिंगणात होते. या चुरशीच्या लढतीत इम्तियाज जलील यांनी 4492 इतक्या मतांनी खैरेंवर विजय मिळवला होता. इम्तियाज जलील हे एमआयएमचे महाराष्ट्रातून निवडूण आलेले एकमेव खासदार ठरले.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

एमआयएमने औरंगाबाद लोकसभेची जागा लढवू नये असा मतप्रवाह पक्षात होता. शहरी भागात पक्षाची ताकद असली तरी ग्रामीण भागात लोकसभेला विजय मिळावा इतके संघटन नसल्याचे स्वतः इम्तियाज यांचेही मत होते. परंतु शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात बंडखोरीचा अंदाज आणि वंचित बहुजन आघाडीमुळे दलितांची एकगठ्ठा मते मिळण्याच्या शाश्वतीमुळे औरंगाबाद लोकसभेची जागा लढवण्याचा निर्णय झाला. संवेदनशील शहरात एमआयएमने लढलेच पाहिजे, मुस्लिम व्होट बॅंक कायम राखण्यासाठी आणि ती अधिक बळकट करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे इम्तियाज यांनी ओवेसी यांना पटवून दिले. उमेदवार म्हणून अर्थातच इम्तियाज यांचे एकमेव नाव समोर होते. त्यानुसार त्यांनाच उमेदवारी जाहीर झाली.

मुस्लिम आणि दलितांची एकगठ्ठा मते आपल्याला मिळतील या पद्धतीने निवडणूक प्रचार यंत्रणा राबवली गेली. ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांच्या संयुक्त सभेने मोठी वातावरण निर्मिती झाली. दुसरीकडे शिवसेनेच्या खैरे यांच्याविरोधात अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी करत मैदानात उडी घेतली. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असल्याने जाधव यांना त्याचाही फायदा झाला. शिवाय खैरे यांच्या पक्षांतर्गत विरोधक आणि युती असूनही भाजपच्या खैरे विरोधकांनी जाधव यांना मदत केली. त्यामुळे जाधव एका लाखापेक्षा जास्त मते घेऊ शकत नाहीत, हा खैरे यांचा अंदाज सपशेल फोल ठरला. जाधव यांनी खैरेंच्या व्होट बॅंकेवर डल्ला मारत तब्बल 2 लाख 83 हजार मते मिळवली. परिणामी दलित-मुस्लिम आणि काही हिंदू मतांच्या जोरावर इम्तियाज यांनी अवघ्या साडेचार हजार मतांनी विजय मिळवला. मतदान केंद्रावर निकाल दृष्टीक्षेपात आल्यानंतर इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांनी एकमेकांना मारलेली मिठी त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

इम्तियाज जलील 2014 मध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आमदार झाले तेव्हापासून त्यांचा शहरी भागात चांगला संपर्क होता. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातही संपर्क वाढवला. एमआयएमची खरी ताकद मुस्लिम तरुण आहेत. या तरुणांची मोठी ताकद इम्तियाज यांच्या पाठीशी आहे. या जोरावरच इम्तियाज यांनी विविध राजकीय आंदोलने, सरकार विरोधातील निदर्शने, मोर्चे यशस्वी केले. आपण केवळ मुस्लिम, दलित समाजाच्या मतांवर निवडून आलो नाही, तर हिंदूंनीही मला मते दिली असे सांगणारे इम्तियाज हिंदू सणांमध्ये सहभागी होतांना दिसतात. आरोग्य, शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था आदी मुद्यांवर आक्रमक भूमिका मांडत असल्यामुळे इम्तियाज यांचे संपर्क कार्यालय लोकांच्या गर्दीने भरलेले असते. दर आठवड्याला इम्तियाज स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

इम्तियाज जलील हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या राजकारण्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियाच्या फेसबुक, आधीच्या ट्विटर आणि आताच्या एक्ससह इन्स्टाग्रामवरही इम्तियाज ॲक्टिव्ह आहेत. सार्वजनिक कार्यक्रमासह, राजकीय घडामोडींचे अपडेट ते देत असतात. या शिवाय मतदारसंघ, राज्य आणि देश पातळीवरील राजकीय, सामाजिक घटना-घडामोडींवर इम्तियाज हे आपली परखड भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. प्रत्येक विषयावर पक्षाची भूमिका, धोरण, राजकीय भाष्य, राज्य आणि राज्याबाहेरील निवडणुकीतील जाहीर सभांमधील भाषणे याचे व्हिडिओ, फोटो ते आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पोस्ट करत असतात. इम्तियाज यांचे फेसबुकवर सात लाखांवर, तर ट्विटरवर पावणे चार लाख फॉलोअर्स आहेत.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Imtiaz Jaleel)

इम्तियाज जलील यांच्यावर शहरात जातीय तणाव वाढवण्याचा आरोप विरोधकांकडून कायम केला जातो. रामनवमीच्या आधी किराडपुऱ्यातील राम मंदिरावर दंगेखोरांनी हल्ला चढवला होता, तेव्हाही त्यांच्यावर आरोप झाला. पण आपण मंदिर वाचवायला गेलो होते, मंदिराला काही झाले असते तर देशभरात दंगल भडकली असती, असा दावा इम्तियाज यांनी केला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना इम्तियाज जलील यांनी तत्कालीन पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर निकष बदलून औद्योगिक भूखंड विकल्याचा आणि त्यातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. आमदार असतांना अधिवेशन काळात सभागृहात प्रश्न विचारणे आणि त्यातून पैसे कमावणे हा मंत्री, आमदारांचा धंदा झाला आहे, असा खळबळजनक आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता.

या शिवाय महापालिकेतील भ्रष्टाचार, पाणीपुरवठा, रस्ते, वक्फ बोर्डाच्या जमिनीमधील भ्रष्टाचार यावरूनही इम्तियाज जलील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. भाजपची बी टीम म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला आव्हान देत एमआयएमसोबत युती करा, आम्हाला सोबत घ्या, असे म्हणत इम्तियाज यांनी त्यांची कोंडी केली होती. लोकसभा निवडणुकीत झालेली एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटण्याला इम्तियाज जलील जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज यांच्यात बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणुकीत एमआयएमसोबत युती करण्यास तयार नव्हते तेव्हा झालेल्या टीकेवरून इम्तियाज यांनी आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलत आहेत, असा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

Imtiaz Jaleel
Ambadas Danve On Aurangabad News : `सांगा आता औरंगाबाद हे नाव आणि औरंगजेब कुणाला आवडतो`..

खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवल्यामुळेही इम्तियाज जलील टीकेचे धनी बनले होते. गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अन्य महापुरुषांचे पुतळे सरकारी पैशांतून उभारण्यास इम्तियाज यांनी विरोध दर्शवला होता. राजकीय पक्षांनी स्वतःच्या पैशांतून पुतळे उभारावेत. सरकारी पैशांतून महापुरुषांचे पैसे उभारण्याऐवजी त्यांचा नावाने रुग्णालय, शाळा, महाविद्यालय उघडून त्याला त्यांची नावे द्या, अशी सडेतोड भूमिका इम्तियाज यांनी घेतली होती. नबाव मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली तेव्हा ते मुस्लिम असल्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जात असल्याची टीका करत त्यांच्या बाजूने आम्ही मैदानात उतरू, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला होता. तेव्हाही ते चर्चेत आले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

एमआयएमचे सर्वेसर्वा, खासदार असदुद्दीन ओवेसी.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. अनेक वर्षे प्रिन्ट आणि डिजिटल मीडियात काम केल्यामुळे त्यांनी राजकारण फार जवळून पाहिले होते. हाडाचे पत्रकार असल्यामुळे हजरजबाबी, आक्रमक शैली, वक्तृत्व या जोरावर त्यांनी अगदी गल्लीतले पण महत्वाचे प्रश्नही संसदेत मांडले. एखादे आंदोलन हाती घेतले तर ते तडीस नेऊन प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. 23 एप्रिल 2015 रोजी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमने औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत 25 जागा जिंकल्या. 29 जानेवारी 2015 मध्ये झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात महागड्या एमआरआय शुल्काचा मुद्दा उपस्थित केला होता. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी घाटीच्या अधिकाऱ्यांना एमआरआय स्कॅनचे शुल्क 1,800 वरून 700 रुपये करण्याचे निर्देश दिले होते.

4 ऑक्टोबर 2017 रोजी इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली आणि औरंगाबादमध्ये महिला आणि मुलांसाठी 200 खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मागितली. न्यायालयाने राज्य आणि जिल्हा प्रशासनांला त्यांचे उत्तर सहा महिन्यांत दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे प्रश्न मार्गी लागले. गोरगरिब रुग्णांना एमआरआयमध्ये सूट मिळाली होती. नुकत्याच उघडकीस आलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यात कोट्यावधींच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांच्या समर्थनात इम्तियाज यांनी मोठे आंदोलन उभे केले. मंत्रिमंडळ बैठकीवर ठेवीदारांचा मोर्चा काढत या प्रश्नावर सरकारला तातडीने कारवाई करण्यास भाग पाडले होते. इतर कुठल्याही राजकीय पक्षाने यात लक्ष घातले नव्हते, इम्तियाज यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आदर्शच्या भ्रष्ट संचालक मंडळावर कारवाई झाली, अनेकांना अटक होऊन आता त्यांची संपती विक्री करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या आंदोलनामुळे ठेवीदारांच्या रुपाने अनेक हिंदू नागरिक इम्तियाज यांच्याशी जोडले गेले. आक्रमक आणि शहर, जिल्ह्याच्या विकासासाठी संसदेत आवाज उठवणारे खासदार म्हणून इम्तियाज यांना सर्वच समाजांचा पाठिंबा वाढत आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

इम्तियाज जलील यांच्या नऊ वर्षांच्या राजकारणात त्यांच्यावर पक्षांतर्गत विरोधकांकडून अनेक आरोप झाले. पक्षातील दुसरे नेते डॉ. गफ्फार कादरी आणि इम्तियाज जलील यांच्यातून विस्तवही जात नाही. राजकारणात आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी किती कमाई केली यावरून पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात टीका करण्यात आली होती. यावेळी पक्षात गटबाजी असल्याचे चित्र दिसून आले होते. इम्तियाज जलील हे राज्याचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे सर्वाधिकार त्यांच्याकडेच आहेत. ते पक्षात मनमानी करतात, असे आरोप करत अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.

या शिवाय नशाबंदी, गुटखा विक्री, महापालिकेतील भ्रष्टाचार, घरकुल घोटाळा, औद्योगिक भूखंड घोटाळा प्रकरणात इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून देणारी विधाने, आरोप केले. पण पुढे हे मुद्दे अर्धवट सोडले. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील पदाधिकारीच संशय व्यक्त करतात. इम्तियाज जलील हे जिल्ह्याचे खासदार असले तरी त्यांचा संपर्क हा मुस्लिम वस्त्या सोडल्या तर इतर भागात अजिबात नाही. शहरातील असे अनेक भाग आहेत, जिथे इम्तियाज जलील यांनी अद्याप पायही ठेवलेला नाही. उच्चशिक्षित, पत्रकार, आक्रमक वृत्तीमुळे लोकांनी त्यांना निवडून दिले असले तरी एमआयएम पक्षाचा एकमेव राज्यातील खासदार म्हणून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. याचा फटका मतदारसंघाला बसल्याची टीका केली जाते.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

इम्तियाज जलील हे एमआयएमचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही. शिवाय पक्षातून अद्याप तरी कुणी उमेदवारीसाठी दावा केलेला नाही. राज्यातील बदलते राजकीय समीकरण, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांमध्ये पडलेली फूट पाहता इम्तियाज जलील यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही फायदा होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीसोबत नसल्यामुळे गेल्यावेळी मिळालेली दलितांची मते एमआयएमला मिळणार नाहीत. त्याची भरपाई भरून काढण्यासाठी एमआयएम नव्या साथीदाराच्या शोधात आहे. महायुतीत ही जागा शिंदेंची शिवसेना लढवणार की भाजप? हे अद्याप स्पष्ट नाही. ठाकरे गटाकडून पुन्हा चंद्रकांत खैरे हेच मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या भांडणाचा पुरेपूर फायदा उचलण्याची संधी एमआयएम कदापी सोडणार नाही. सध्या तरी इम्तियाज जलील यांना एमआयएमकडे दुसरा पर्याय नाही.

(Edited By Roshan More)

Imtiaz Jaleel
High Court News : छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद ? केंद्र व राज्य शासनाला खंडपीठाची नोटीस..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com