Chhatrapati Sambhajinagar Election 2025 : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक घडामोडी घडल्या. पळवा पळवी, फोडाफोडी, लक्ष्मीदर्शन आणि बरेच काही. एवढे करूनही जिल्ह्यातील मतदारांनी कोणालाही नाराज न करता प्रत्येक पक्षाच्या वाट्याला सत्तेची संधी मिळेल अशा पद्धतीने कौल दिला आहे. महायुती-महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे इथे खाते उघडले आहे. अपवाद फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीचा एकमेव खासदार याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने निवडून दिला होता. तर विधानसभेला सर्वच्या सर्व सहा आमदारही महायुतीचेच निवडून आले होते. अनेक वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग झाल्यानंतर मात्र मतदारांनी महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीनही पक्षाला यश दिले. तर महाविकास आघाडीवरही अन्याय न करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या वाट्यालाही तीन नगराध्यक्ष आणि सत्ता आली.
गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना मतदारांनी यावेळी चांगलाच धडा दिल्याचे दिसून आले. या गंगापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जाधव हे नगराध्यक्ष पदावर विजयी झाले. तर खुलताबादचे नगराध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला गेले. तिथे आमेर सय्यद पटेल हे महाविकास आघाडीकडून विजयी झाले आहेत. मतदारसंघातील दोनही नगरपरिषदा हातून गेल्याने बंब यांच्यासाठी हा झटका असल्याचे बोलले जाते.
शिवसेनेचे वैजापूरचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांची प्रतिष्ठा नगरपरिषदेच्या निमित्ताने पणाला लागली होती. ज्याचा आमदार त्याचाच नगराध्यक्ष, अशी भूमिका बोरनारे यांनी मांडली होती. स्वतःच्या भावासाठी नगराध्यक्ष पदाची जागा मागून घेतली. शहरात प्रचारात आघाडी घेतली, मतदारसंघात आणलेला निधी, केलेली विकासकामे यांची यादी वाचून दाखवत विरोधक भाजपला पराभूत करण्याचे आवाहन केले. पण वैजापूर शहरातील मतदारांनी बोरनारे यांच्या पक्षाचे सर्वाधिक दहा नगरसेवक निवडून दिले, पण नगराध्यक्ष पदावर भाजपच्या दिनेश परदेशी यांना पसंती दिली. त्यामुळे बोरनारे यांचा वैजापूर नगरपरिषदेवर वर्चस्व मिळवण्याचा डाव फसला.
शिवसेनेच्या आमदार संजना जाधव यांनाही नगरपरिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कन्नडमध्ये सभा घेत शिवसेनेच्या विजयाचा दावा केला होता. स्वतः संजना जाधव यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. परंतु नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या फरिन जावेद शेख यांना निवडून देत सत्ताधारी शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का दिला.
संदीपान भुमरे खासदार आणि विलास भुमरे आमदार झाल्यानंतरच्या पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्ता गोर्डे यांच्या पत्नी अपर्णा गोर्डे या शिवसेनेच्या विद्या कावसानकर यांच्या विरोधात मैदानात होत्या. निवडणूक प्रचारात गोर्डे यांनी चांगली हवा केली होती. भुमरे पिता-पुत्रांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आव्हानही दिले. मात्र मतदारांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तीन हजाराच्या मताधिक्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या कावसानकर या निवडून आल्या. सर्वाधिक जागा जिंकत पैठण नगर परिषेदत धनुष्यबाणाची सत्ता आणण्यात भुमरेंना यश आले.
सिल्लोड नगरपरिषदेवरील एकहाती सत्ता सलग पाचव्यांदा अब्दुल सत्तार यांनी राखली. मुलगा समीर सत्तार याला तब्बल 23 हजारांच्या मताधिक्याने निवडून आणत वेगळाच रेकॉर्ड केला. 28 पैकी 25 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. भाजपच्या वाट्याला फक्त तीन जागा आल्या. इथे सत्तार यांना विरोधकच नव्हता, भाजपने पराभव दृष्टीक्षेपात असल्याने फारसे प्रयत्नही केले नाही. त्यामुळे सिल्लोडमध्ये अपेक्षेप्रमाणेच निकाल लागला. सत्तार यांनी स्वबळावर निवडणूक लढवली, कोणत्याही नेत्याला प्रचाराला आणले नाही. सगळी सुत्रं आपल्या हाती ठेवली आणि विजयाची परंपरा कायम राखली.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या फुलंब्री मतदारसंघातील नगर परिषदेवर याआधी भाजपची सत्ता होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या सत्तेला सुरूंग लावत तिथे मशाल पेटवली. राजेंद्र ठोंबरे यांनी गेल्यावेळी थोडक्यात हुकलेला विजय यावेळी तब्बल अठराशे मतांच्या मताधिक्याने साकारला. नगराध्यक्ष पदासह फुलंब्री नगरपरिषदेची सत्ता मिळवत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्ह्यात एकमेव नगरपरिषदेत विजयाची नोंद केली. भाजपच्या सुहास शिरसाट यांचा हा पराभव नेते रावसाहेब दानवे, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.