BJP News : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गेली वीस वर्ष छोट्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या भाजपने काल ऐतिहासिक विजयाची नोंद केली. स्वबळावर 98 उमेदवार देत भाजपने तब्बल 57 नगरसेवक निवडून आणत बहुमत पटकावले. महापालिकेवर शतप्रतिशत सत्ता आणि महापौर बसवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न त्यांना स्थानिक शिलेदारांनी पूर्णत्वास आणले.
राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर, शहरजिल्हाध्यक्ष किशोर शितोळे व शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपने मिशन महापालिके इम्पाॅसिबल वाटणारे मिशन पाॅसिबल करून दाखवले. मंत्री अतुल सावे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेची जबाबदारी दिली आणि ती त्यांनी मेरिटमध्ये पार पाडली.
महापालिकेत भाजपला बहुमत आणि कुठल्याही कुबड्यांशिवाय महापौर बसणार हे स्पष्ट झाल्यानंतर अतुल सावे यांनी मुंबईत धाव घेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बाळासाहेब ठाकरे यांच्या बालेकिल्यात भाजपने पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा स्वबळावर सत्ता आणल्याबद्दल फडणवीसांनी सावे यांची पाठ थोपटली. पेढा भरवत त्यांचे तोंड गोड केले आणि त्यांना शाबसकीही दिली.
शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजपमध्ये तिकीट वाटपावरून मोठा राडा झाला होता. अतुल सावे यांनी आपल्या पीएला तर खासदार भागवत कराड यांनी त्यांच्या समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिल्याचा आरोप, त्यातून प्रचार कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, महिलांनी अन्याय झाला म्हणून टाहो फोडत केलेले उपोषण यातून पक्षाची प्रतिमा डागाळली गेली. निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकीट विकल्याचा आरोप संतप्त इच्छूकांनी सावे, कराड या नेत्यांवर केला. त्याच्या गाड्यांसमोर आडवे पडले, शिव्याही हासडल्या गेल्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष आणि नाराजी असूनही भाजपने या सगळ्या परिस्थितीवर मात करत महापालिका निवडणुकीत मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. काही महिन्यांपुर्वी संजय केनेकर यांची विधान परिषदेवर निवड झाली आणि महायुती सरकारमध्ये अतुल सावे यांना राज्यमंत्री पदावरून कॅबिनेटपदी बढती देत देवाभाऊंनी महापालिका निवडणुकीचा पाया रचला होता. त्यावर स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेत कळस चढवण्याचे काम सावे, केनेकर, कराड या त्रिमुर्तींनी केले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवत तब्बल 57 जागा जिंकल्यानंतर अतुल सावे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सक्षम बूथ आणि प्रभाग निहाय सूक्ष्म नियोजनातून हा विजय शक्य झाला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन अत्यंत अमूल्य ठरले, अशी प्रतिक्रिया सावे यांनी या भेटीनंतर दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.