Chhatrapati Sambhajinagar : माधव इतबारे
अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महापालिका आयुक्तांनी नुकत्याच बदल्या केल्या. त्यावरून राजकारण चांगलेच तापले. महापौर आणि सभापतींमधील मतभेद यानिमित्त चव्हाट्यावर आले आहेत. 'कोणत्या अधिकाऱ्याकडून कोणते काम करून घ्यायचे, ही प्रशासकीय बाब आहे', अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे.
'आम्हाला सांगून बदल्या झाल्या पाहिजेत', अशा शब्दांत सभापती अनिल मकरिये यांनी आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे शुक्रवारी (ता. १८) नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ऐकावे तरी कोणाचे? असा प्रश्न आयुक्तांना पडला आहे. महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ लिपिकांना नुकत्याच अधीक्षक पदावर पदोन्नत्या दिल्या आहेत. या पदोन्नत्या देताना काही जणांचे विभाग बदलावे लागले, तर काही जण अनेक वर्षांपासून एकाच विभागात असल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांवरून आठवडाभरापासून महापालिकेत धुसफूस सुरू आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना त्याच विभागात कार्यरत ठेवावे, यासाठी काही नगरसेवक, माजी पदाधिकारी, निवृत्त अधिकारी व संबंधित अधिकाऱ्याच्या समाजाच्या संघटनांकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. यातील एक अधिकारी नगररचना विभागात कार्यरत होता, त्यांना आता इतर विभागाचा पदभार देण्यात आला आहे.
हा पदभार तातडीने बदलावा यासाठी 'भेटीगाठी' सुरू आहेत. या बदल्यांवरून शुक्रवारी महापौर समीर राजूरकर आणि स्थायी समिती सभापती मकरिये यांच्यात विसंवाद असल्याचे समोर आले. मकरिये यांनी आयुक्तांची भेट घेऊन बदल्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशासकीय बाब-महापौर, विश्वासात घ्या, सभापती!
महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विभाग नियमित बदललेच पाहिजेत. कोणाकडून कोणते काम करून घ्यायचे, ही प्रशासकीय बाब आहे, असे महापौर समीर राजूकर यांनी सांगितले. तर सभापतींनी आयुक्तांची शुक्रवारी भेट घेऊन बदल्यांबाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही पदाधिकारी असताना माहिती न देता बदल्या करणे योग्य नाही. यापुढे बदल्या करताना आम्हाला विश्वासात घ्यावे, अशी भूमिका आयुक्तांकडे मांडल्याचे सभापती अनिल मकरिये यांनी म्हटले आहे.
वरिष्ठ लिपिकांना पदोन्नती देताना काही जणांचे विभाग बदलले आहेत; पण याविषयीची नाराजी किंवा कोणत्याही सूचना एकाही पदाधिकाऱ्याने माझ्याकडे केलेल्या नाहीत, असे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगत या वादात न पडण्याची सावध भूमिका घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.