Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation as BJP leaders Anil Makariye, Raj Wankhede and Adv. Madhuri Adwant emerge as contenders for Standing Committee chairman. Sarkarnama
मराठवाडा

BJP News: महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाच्या हाती? स्थायी समिती सभापती पदासाठी तीन दिग्गज नेत्यांमध्ये चुरस

CSMC standing committee chairman : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे अनिल मकरिये, राज वानखेडे आणि माधुरी अदवंत यांच्यात चुरस वाढली आहे. महापालिकेच्या आर्थिक अधिकारांमुळे या पदाला विशेष महत्त्व आहे.

माधव इतबारे

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : महापालिकेतील स्थायी समिती आणि विषय समित्यांवरील नियुकत्या आज गुरूवारी (ता. 5) जाहीर झाल्या. महापौर समीर राजूकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत भाजपाचे आठ, एमआयएमचे चार, शिवसेनेचे दोन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक आणि काँग्रेस-वंचित आघाडीच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. आता स्थायी समिती सभापती कोण होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सभापतीपदाची माळ भाजपाचे अनिल मकरिये यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मकरिये यांनी नकार दिल्यास राज वानखेडे, ॲड. माधुरी अदवंत यांच्या नावाचा देखील विचार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेत आर्थिक अधिकार असलेल्या स्थायी समितीला महत्त्व आहे. त्यानुसार स्थायी समितीवर जाण्यासाठी दिग्गज नगरसेवकांमध्ये रस्साखेच सुरू होती.

गुरुवारी (ता. 5) स्थायी समितीसह पाच विषय समित्यांवर सदस्य नियुक्तीसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार प्रत्येक गटनेत्यांकडून महापौर समीर राजूरकर यांनी प्रस्ताव मागविले. त्यात भाजपचे गटनेते गोविंद केंद्रे, एमआयएमचे शेरखान हाजी अब्दुल रहेमान, शिवेसनेचे किशोर नागरे, शिवसेना ठाकरे गटाचे गणेश लोखंडे, लोकसेवा विकास आघाडीचे अफसर खाना यांनी आपआपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे दिली.

ही नावे महापौरांनी सभागृहात वाचून दाखविली. स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व असून, महापौरपदासाठी शेवटपर्यंत स्पर्धेत असलेले अनिल मकरिये यांची स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गटनेता उशिरा, एमआयएमचे टेन्शन वाढले

महापौरांनी सुरुवातीला स्थायी समितीसाठी सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार एमआयएम वगळता इतर गट नेत्यांनी पाकिटे दिली. पण एमआयएम पक्षाचे गटनेते सभागृहात आलेले नव्हते. त्यावर महापौरांनी तीन मिनिटांची वेळ दिली व एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांची धाकधूक वाढली. एमआयएमचे गट नेते शेरखान हाजी अब्दुल रहेमान कुठे आहेत? हे शोधण्यासाठी अनेक जण सभागृहाबाहेर आले. विरोधीपक्षनेत्यांनी तीन नव्हे तर पाच मिनिटांच्या वेळेची मागणी केली. दरम्यान काही नगरसेवक त्यांना घेऊन सभागृहात आले.

पालकमंत्र्यांच्या घराणेशाहीला ब्रेक

शिवसेनेत उपमहापौरांवरून वाद पेटला होता. राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीला उपमहापौर करायचे होते, असा आरोप केला होता. स्थायी समितीवर शिरसाट यांच्या समर्थकांची नावे असली तरी त्यांच्या घरातील सिद्धांत शिरसाट, हर्षदा शिरसाट यांना एकाही समितीवर पाठविता आलेले नाही.

महापौरांनी भरला दम

पहिल्याच बैठकीत महापौरांच्या इशाऱ्यामुळे शांतता होती. एका प्रसंगावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी ‘आम्ही घाबरणार नाही, तुम्ही घाबरता, असे वक्तव्य सभागृहात केले. त्यावर ‘अशी भाषा सभागृहात चालणार नाही, अन्यथा सभागृहाबाहेर काढीन, अशी तंबी राजूरकर यांनी दिली. त्यानंतर पुन्हा सभागृहात शांतता पसरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT