Pradip Jaiswal-Kishanchand Tanwani Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : आमदार प्रदीप जैस्वाल यांचा तणवाणींना पुन्हा धोबीपछाड : आधी गोड बोलून विधानसभा काढली, आता महापालिकेसाठीही झुकवलं!

Shivsena News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचा निर्णय प्रलंबित असतानाच शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून गुलमंडी प्रभागातून ऋषीकेश जैस्वाल रिंगणात उतरले आहे

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचा निर्णय झालेला नाही. परंतु आता थांबणे शक्य नाही, असे सांगत शिवसेनेच्या काही उमेदवारांनी अर्ज दाखल करायला सुरवात केली. आमदार प्रदीप जैस्वाल यांचे सुपुत्र ऋषीकेश जैस्वाल यांनीही गुलमंडी प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या जागेवरून माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल यांच्यात वाद होता.

किशनचंद तनवाणी यांचे बंधू या प्रभागातून अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय तनवाणी यांचे चिरंजीव हे ही स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत होते. यावेळी गुलमंडी प्रभागातून भावाला किंवा मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी किशनचंद तनवाणी आग्रही होते. हा दावा सांगताना विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारून आपण हिंदू मतांचे विभाजन टाळले. त्यावेळी केलेल्या त्यागाची आठवण ठेवून प्रदीप जैस्वाल यांनी गुलमंडी प्रभागावर आपला मुलगा ऋषीकेश जैस्वाल यांच्यासाठी सांगितलेला दावा मागे घ्यावा, अशी मागणी तनवाणी यांनी केली होती.

हा वाद अगदी टोकाला गेला होता, यातूनच सुरवातीला किशनचंद तनवाणी यांना शिवसेनेने गठीत केलेल्या मुख्य समन्वय समितीत टाळण्यात आले होते. मात्र तनवाणी यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन आमची अडचण होत असेल तर आम्हाला पदमुक्त करा, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर संजय शिरसाट यांनी किशनचंद तनवाणी यांच्यासह विकास जैन यांचे नाव समितीत समाविष्ट करून घेतले होते.

शिवसेना-भाजप युती काही जागांमुळे अद्याप होऊ शकलेली नाही. काही प्रभागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असले तरी दहा ते बारा जागांवर घोडे अडले आहे. त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत वाट न पाहता शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षातील ज्या उमेदवारांना उमेदवारी फिक्स आहे, अशांनी आजपासून आपापले अर्ज दाखल करायला सुरूवात केली आहे. ऋषीकेश जैस्वाल यांनी गुलमंडी प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळ त्यांच्यासोबत आमदरा प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ उपस्थित होते.

ऋषीकेश जैस्वाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे किशनचंद तनवाणी यांनी गुलमंडी वार्डातून भाऊ आणि मुलासाठी केलेला दावा मागे घेतला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. युतीची बोलणी आणि जागा वाटपाच्या बोलणीत तनवाणी यांचा सक्रीय सहभाग आहे. युती अंतिम झालेली नसतांना शिवसेनेकडून काही उमेदवारांनी अर्ज दाखल करायला सुरूवात केली आहे. ऋषीकेश जैस्वाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता तनवाणी यांची नेमकी काय भूमिका असणार आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT