योगेश पायघन
Chhatrapati Sambhajinagar News : हिवाळी अधिवेनाच्या निमित्ताने नागपुरात असलेल्या उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक घेतली. पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात समेट घडवून आणत महायुतीत समन्वयाने जिंकण्यासाठी लढा, असे स्पष्ट आदेशच शिंदे यांनी बैठकीत दिला. नागपूरच्या गुलाबी थंडीत संभाजीनगर महापालिका जिंकण्याचा प्लॅनच ठरवण्यात आल्याचे बोलले जाते.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. 10) रात्री तासभर बैठक घेतली. महायुतीत निवडणूक लढण्यासाठी समन्वयातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्या असून समन्वय समिती गठीत करत पालकमंत्री -जिल्हाप्रमुख वादावरही तोडगा काढला आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शिंदे यांनी समन्वय समितीची बैठक देवगिरी बंगल्यावर घेतली. बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार सांदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, विलास भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश जैस्वाल, माजी महापौर विकास जैन, त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती. बैठकीत वादावर चर्चा झाली नसली तरी पालकमंत्री शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे शेजारी शेजारी बसलेले पाहायला मिळाले.
तसेच मित्र पक्षातील प्रवेशावर बैठकीत चर्चा झाली. झालेल्या प्रवेशासाठीही कल्याण प्रमाणे स्थगिती मिळेल या दृष्टीनेही बैठकीत चर्चा झाली. शिवसेना इच्छुक उमेदवारांचे अर्ज वाटप करण्यात येणार आहे शिवसेना इच्छुक उमेदवार यांनी शुक्रवारी (ता. १२) समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात ते अर्ज भरून जमा केल्यावर इच्छुकांच्या मुलाखती होतील.
सोमवारी घेणार मुलाखती
एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात समन्वय समितीचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीपजी जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्रजी जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल हे मुलाखती घेणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले. शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी महापालिकेतील सत्ता मिळवावी लागेल. त्यामुळे एकत्रित पणे जिंकणारा उमेदवार निश्चिती समन्वय समिती करेल. त्यावर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रभाग नव्हे जुन्या वॉर्ड नुसार सूत्र
गेल्या निवडणुकीतील जिंकलेल्या 29 जागा तसेच 6 प्रवेश केलेलं अपक्ष नगरसेवक ही प्राथमिकता आणि भाजपच्या जागा सोडून उरलेल्या जागांवर वाटप असे सूत्र असण्याची शक्यता असून थेट प्रभाग मागणी आता मागे पडणार आहे. जुन्या जागांवर दावा असेल त्यामुळे त्यानुसारच जागावाटप आगामी काळात ठरेल. तसेच या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी विभागनिहाय, बूथनिहाय आणि विषयनिहाय विविध समित्यांची स्थापना करून प्रत्येक समितीला स्पष्ट जबाबदाऱ्या देत मजबूत संघटन उभारण्याचे आणि लोकसंपर्क वाढवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.