

Lok Sabha political debate : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. लोकसभेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान बोलताना शहांनी ठाकरेंचे नाव घेत त्यांच्यावर टीका केली. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंच्या जिव्हारी लागणारा घाव केला आहे.
काय म्हणाले अमित शहा?
तमिळनाडूमध्ये एका मंदिर परिसरातील दीपस्तंभावर दीपप्रज्वलन करण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. टेकडीच्या पायथ्याशी हे मंदीर असून टेकडीवर दर्गा आहे. त्यामुळे तेथील सरकारने धार्मिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून दीपप्रज्वलन करण्यास मनाई केली आहे. मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी मात्र ही परवानगी देत राज्य सरकारला कडेकोड बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यावर सरकार सुप्रीम कोर्टात गेले आहे.
या घडामोडींनंतर मंगळवारी हायकोर्टाच्या संबंधित न्यायाधीशांविरोधात विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्षांकडे महाभियोगाचा प्रस्ताव दाखल केला. त्यावर ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत यांचीही सही आहे. हाच मुद्दा शहांनी लोकसभेत काढला. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर कधीही असे झाले नाही. न्यायाधीशांच्या निकालावर विरोधकांनी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला आहे.
आपल्या वोटबँकेला खूष करण्यासाठी महाभियोग आणला जातो. या सगळ्यांनी तर सह्या केल्याच पण उद्धवजींनीही सही केली, असे सांगत शहांनी ठाकरेंना डिवचले. यावेळी तमिळनाडूसह ठाकरेंच्या खासदारांनी त्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शहांच्या या भाषणाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘कोण होतास तू, काय झालास तू’, असे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले आहे.
अरविंद सावंतांचा खुलासा
अरविंद सावंत यांनी महाभियोगाच्या प्रस्तावावर खुलासा करताना सांगितले की, इंडिया आघाडीमधील तब्बल 107 खासदारांनी तामिळनाडूमधील न्यायाधीशांच्या निर्णय प्रक्रियेतील काही बाबी नमुद करणार्या इम्पीचमेंटच्या नोटीसवर सह्या केल्या. ह्या नोटीसमध्ये अनेक तर्कशुद्ध मुद्दे नमुद केलेले आहेत, परंतु प्रत्येक मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणार्या भाजपने ह्यात देखील ओढूनताणून विद्वेष पसरविण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप सावंतांनी केला आहे.
मी स्वत: येतो तुमच्या सोबत दिवा लावायला, बघु या कोण थांबवतं, असे आव्हानही सावंत यांनी दिले. या नोटीसमधील तर्कशुद्ध मुद्यांना बगल देऊन निव्वळ धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. भाजपला तामिळनाडूमध्ये धार्मिक तेढ पसरवायची आहे, ह्यासाठी यंत्रणांचा वापर सुरू आहे. ह्या विरोधात हा इंडिया आघाडीचा एकत्रित आवाज आहे, असेही सावंत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.