Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला पिण्याचे मुबलक पाणी मिळाले पाहिजे, ते लवकरात लवकर देण्यासाठी जे काचायचे ते करा. उर्वरित टप्पे पूर्ण करायला किती दिवस लागतील? याचा अहवाल दहा दिवसात द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदारांची खरडपट्टी केली. योजनेतील तांत्रिक अडचणी युद्धपातळीवर सोडवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची कासवगती, निकृष्ट काम, कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमधील बेबनाव या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी योजनेचा आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी महापौर समीर राजूकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर आज तातडीने मुंबईत मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी, महापौर, उपमहापौर, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत फडणवीसांनी योजनेचा आढावा घेतला.
नव्या पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम तसेच अधिकारी-कंत्राटदारामधील बेबनावावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत कंत्राटदार कंपनीसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कडक शब्दांत हजेरी घेतली. योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी तांत्रिक अडचणी युद्धपातळीवर सोडवा, त्यासाठी माइलस्टोन (कामाचे निश्चित वेळापत्रक) पुढील दहा दिवसांत लेखी स्वरूपात सादर करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शहराची 2740 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. दरम्यानच्या काळात जलशुद्धीकरण केंद्राच्या छताला लागलेली गळती व व्हॉल्व्ह निकृष्ट असल्याचे समोर आले. त्यावरून कंत्राटदार कंपनी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये बेबनाव झाला. एका अधिकाऱ्याला निलंबित केल्याच्या कारणावरून इतर अधिकाऱ्यांनी पाणी योजनेच्या कामातून कार्यमुक्त करण्याचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले. त्याचा परिणाम योजनेच्या कामावर होत आहे.
याप्रकरणी महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार फडणवीस यांनी मुंबईत आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अतुल सावे हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले तर, समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, आमदार सतीश चव्हाण, सुहास शिरसाट, जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगानायक, अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन, गोविंदराज, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त अमोल येडगे, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे शिवा रेड्डी, जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांची उपस्थिती होती.
बैठकीत प्रारंभी पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सादरीकरण केले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी योजनेच्या विलंबाबत नाराजी व्यक्त केली. पाणी योजनेच्या कामाची जागेवर जाऊन पाहणी करावी, योजनेचे पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?, याचा अहवाल दहा दिवसांत सादर करा, असे आदेश फडणवीस यांनी बैठकीत दिले.
उर्वरित जलवाहिन्यांचे काम पूर्ण करावे, खोदलेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीचे काम त्वरित सुरू करावे, खड्ड्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, योजनेवरील कामगारांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदार कंपनीसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला बजावले. नागरिकांना लवकरात लवकर पाणी मिळालेच पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
असा आहे पाणी योजनेचा प्रवास..
शहराच्या 2052 मधील संभाव्य लोकसंख्येला 604 एमएलडी (दशलक्ष लिटर दर दिवशी) एवढा पाणीपुरवठा गृहीत धरून जायकवाडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पाणी वितरणासाठी शहरात 59 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार त्यापैकी 29 पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात 1911 किलोमीटर पाणी पुरवठा वितरण प्रणालींपैकी 1291 किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 46 हजार 500 नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.